नाशिकमध्ये गोदावरी स्वच्छतेचे २.४३ कोटींचे टेंडर वादात; अनुभवाची अट ऐनवेळी बदलली

टेंडरची मुदत दोनदा वाढवली; तीन वर्षांच्या अनुभवाचा पूर्णत्व दाखला देण्याची अट काढल्याने मक्तेदारांचा आक्षेप, महापालिकेचा स्पर्धा वाढविण्याचा दावा
Nashik Godavari Cleaning Tender : २.४३ कोटींचे टेंडर वादात
Godavari NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik): गोदावरी नदीसह शहरातून वाहणाऱ्या उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी नाशिक महापालिका २ कोटी ४३ लाख ८७ हजार ९२० रुपये खर्च करणार असतानाच या कामाचे टेंडर वादात सापडले आहे. टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर कामाच्या अनुभवाची अट शिथिल करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशिष्ट ठेकेदाराला पात्र ठरविण्यासाठी अटी-शर्ती बदलण्यात आल्याचा आरोप मक्तेदारांनी केला असून, टेंडर रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही काही मक्तेदारांनी दिला आहे. दरम्यान, टेंडरमध्ये अधिकाधिक स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी अनुभवाची अट शिथिल केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Nashik Godavari Cleaning Tender : २.४३ कोटींचे टेंडर वादात
द्वारका ते नाशिकरोड 10 पदरी रस्त्याचे काय झाले? 6 महिन्यांपासून टेंडर-टेंडरचा खेळ

नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी, वालदेवी, वाघाडी (वरुणा), कपिला आणि नंदिनी या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या गोदावरी संवर्धन विभागाने ३० जुलै रोजी टेंडर प्रसिद्ध केले होते. या कामासाठी ८० अकुशल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून नदीपात्र, नदीकाठ आणि परिसरातील जलपर्णी, प्लास्टिक, कागद तसेच केरकचरा काढण्यात येणार आहे. हे काम नऊ महिन्यांसाठी केले जाणार आहे.

टेंडर भरण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्ट होती. त्यापूर्वी ४ ऑगस्ट रोजी झालेल्या प्री-बीड बैठकीत टेंडरमधील अटी-शर्तींमध्ये बदल केला जाणार नसल्याचे मक्तेदारांना सांगण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर टेंडर १४ ऑगस्ट रोजी उघडण्यात येणार होते. मात्र, टेंडरला २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा २५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देताना अनुभवाची महत्त्वाची अट शिथिल करण्यात आली.

गोदावरीला दरवर्षी जलपर्णीचा विळखा पडतो. प्लास्टिक आणि अन्य केरकचऱ्यामुळे गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर आहे. अशा परिस्थितीत नदी स्वच्छतेसाठी अडीच कोटी रुपयांहून अधिक खर्च होत असताना संबंधित कामाचा अनुभव असण्याची अट अचानक शिथिल करण्यात आल्याने मक्तेदारांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Nashik Godavari Cleaning Tender : २.४३ कोटींचे टेंडर वादात
Nashik Tender News: काम न करताच पुन्हा ₹3.75 कोटींचे बील काढून घेण्याचा डाव कसा उधळला?

नेमकी कोणती अट शिथिल?

टेंडरमध्ये नदीतील जलपर्णी, नदीकिनारा आणि नदीपात्रातील प्लास्टिक, कागद व केरकचरा काढण्याच्या कामाचा प्रशासकीय किंवा निमशासकीय संस्थेचा किमान तीन वर्षांचा अनुभव असल्याचा पूर्णत्व दाखला सादर करण्याची अट होती. ही अट नंतर शिथिल करण्यात आली. नदी स्वच्छतेसारख्या विशिष्ट स्वरूपाच्या कामासाठी अनुभवाची अट काढण्यात आल्याने मक्तेदारांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.

स्पर्धा वाढविण्यासाठी अट बदलली

काही मक्तेदारांनी जलपर्णी आणि नदी स्वच्छतेच्या कामाचा अनुभव असण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली होती. संबंधित मक्तेदारांनी आयुक्तांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली होती. अधिकाधिक मक्तेदारांनी टेंडर प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि स्पर्धा व्यापक व्हावी, यासाठी आयुक्तांच्या निर्णयानंतर अटी-शर्तींमध्ये बदल करण्यात आल्याचे गोदावरी संवर्धन विभागाच्या उपायुक्त संगीता नांदुर्डीकर यांनी स्पष्ट केले.

मात्र, नदी स्वच्छतेचा अनुभव नसलेल्या मक्तेदाराकडून गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या स्वच्छतेचे काम अपेक्षित दर्जाने होईल का, हा प्रश्न या बदलामुळे उपस्थित झाला आहे.

Nashik Godavari Cleaning Tender : २.४३ कोटींचे टेंडर वादात
वसई-विरारचे 957 कोटींचे घनकचरा टेंडर संशयाच्या भोवऱ्यात

Key Points

  • गोदावरीसह पाच नद्यांच्या स्वच्छतेसाठी २.४३ कोटींचे टेंडर,

  • ८० कर्मचाऱ्यांमार्फत नऊ महिने नदी स्वच्छतेचे काम,

  • टेंडरची मुदत २५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली,

  • किमान तीन वर्षांच्या अनुभवाची अट नंतर शिथिल,

  • विशिष्ट ठेकेदाराला पात्र ठरविण्यासाठी अट बदलल्याचा मक्तेदारांचा आरोप,

  • स्पर्धा वाढविण्यासाठी अट बदलल्याचा महापालिकेचा खुलासा.

Tendernama
www.tendernama.com