Nashik : त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

Skywalk
SkywalkTendernama

नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर त्र्यंबकेश्वर देवस्थान व त्र्यंबकेश्वर नगरपालिका यांच्याकडून भाविकांच्या सोईसुविधा व पायाभूत विकास यासाठी सिंहस्थ आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्यामध्ये भाविकांना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुलभरित्या घेता यावे, यासाठी स्कायवॉक उभारण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. या स्कायवॉकसाठी साधारणपणे आठ कोटी रुपये निधीची आवश्यकता असून त्यामुळे भाविकांना थेट स्कायवॉकवरून मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ खाली उतरवता येईल. यामुळे भाविकांना सुलभरित्या दर्शन घेता येईल, असे देवस्थानचे म्हणणे आहे.

Skywalk
Nashik News : जिल्हा वार्षिक योजनेतील 1263 कोटींचे नियोजन निवडणुकीमुळे रखडणार 

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन देवस्थानने मंदिराच्या पूर्व दरवाजाबाहेर एक तात्पुरता मंडप उभारला असून तेथे दर्शनबारीची सुविधा करण्यात आली आहे. तसेच या दर्शनबारीत उभे न राहता दर्शन घेऊ इच्छिणार्या भाविकांसाठी शुल्क आकारून दर्शन घडवण्याचीही सुविधा आहे. मात्र, या सशुल्क दर्शनामुळे दर्शनबारीतील भाविकांना दर्शन घेण्यासाठी खूप वेळ लागत असतो. यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त होत असते. त्र्यंबकेश्वर मंदिर राष्ट्रीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असल्याने मंदिरापासून १०० मीटर अंतराव पक्के बांधकाम करण्यास परवानगी नसल्याने मंदिरालगत दर्शनबारी उभारण्यावर मर्यादा आहेत. दर्शनबारीसाठी उभारलेल्या मंडपाचा आकार कमी असल्यामुळे सुटीच्या तसेच पर्वणी काळात भाविकांची संख्या वाढल्यानंतर मंडपात जागा उरत नाही. यामुळे भाविकांना त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांवर रांगा लावाव्या लागतात. रस्त्यावर ऊन, पावसात भाविकांना उभे राहावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत असते  यावर तोडगा म्हणून स्कायवॉक उभारण्याचा प्रस्ताव त्र्यंबकेश्वर देवस्थान व नगरपालिका यांनी तयार केला असून त्या प्रस्तावाचा समावेश सिंहस्थ आराखड्यात केला आहे.

Skywalk
Nashik : इंडियाबुल्सच्या सेझचे अठरा वर्षांचे उद्योगनगरीचे स्वप्न भंग; जमीन परत घेण्याची नामुष्की

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी आणि देवस्थानच्या पदसिद्ध सेक्रेटरी डॉ. श्रीया देवचके यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की,  भाविकांच्या दर्शनबारीसाठी प्रस्तावित स्कायवॉकसाठी नगरपरिषद जागा उपलब्ध करून देणार असून स्कायवॉक पूर्व दरवाजापर्यंत असलेल्या दर्शन रांगेत भाविकांनाखाली उतरवणार आहे. या प्रकल्पाचा खर्च सिंहस्थ कुंभमेळा अनुदानातून केला जाणार आहे. या स्कायवॉकची रुंदी साधारण पाच मीटर राहणार आहे. या स्कायवॉक तथा ओव्हर ब्रीजसाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भाविकांना मंदिराच्या पूर्व दरवाजापर्यंत स्कायवॉकने पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी तीन मजली वाहनतळापासून ते थेट मंदिराच्या पूर्व दरवाजापर्यंत त्र्यंबक नगरपरिषदेतर्फे चाचपणी करण्यात आली आहे. यामुळे दर्शनबारीत भाविकांची गर्दी झाल्यानंतर भाविकांना ररस्त्यावर उभे राहण्याची वेळ येणार नसून भाविक वाहनतळापासून थेट स्कायवॉकद्वारे मंदिरापर्यंत पोहोचू शकणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com