
नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्याच्या टेंडर (Tender) प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी सहभागी ठेकेदारांनी (Contractor) बनावट कागदपत्र जोडल्याचे समोर आले आहे. महापालिकेने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या ई टेंडर (E Tender) प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी दोन ठेकेदारांनी अनुभवाचे बनावट दाखले जोडल्याची बाब छाननीत उघड झाली आहे. यामुळे महापालिका या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार असून, तशी कार्यवाही सुरू केली आहे.
नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहराच्या विविध भागांत मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या तोडणे, तसेच झाडांचा घेर कमी करून पालापाचोळा गोळा करून तो वाहून नेण्यासाठी ठेका दिला जातो. यावर्षी सातपूर, सिडको, नाशिक पूर्व व पश्चिम तसेच पंचवटी या पाच विभागांसाठी उद्यान विभागाच्या वतीने वादळवारे, नैसर्गिक कारणांनी उन्मळून पडलेली झाडे उचलून, वाहून नेणे तसेच रस्त्यावरील उभ्या असलेल्या वृक्षांच्या धोकादायक फांद्यांचा विस्तार व वाळलेली धोकादायक कीडग्रस्त झाडे तोडण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
यासाठी ऑनलाईन टेंडरी प्रक्रिया राबवण्यात आली. प्रत्येक विभागासाठी साधारणपणे २० लाख रुपयांची रक्कम ठरवण्यात आली आहे. टेंडर दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर त्याचा तांत्रिक लिफाफा उघडण्यात आला. त्यावेळी सातपूर विभागासाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी राबवण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत सायली नंदकुमार विसपुते यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बळसाणे ग्रामपंचायत हद्दीत अशा प्रकारचे काम केल्याचा दाखला दिला होता. मात्र, संबंधित ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता असे कुठलेच काम केले नसल्याचे व कागदोपत्री नोंद नसल्याचे बळसाणे ग्रामपंचायतीने कळवले. यामुळे अनुभवाचा दाखला बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
सिडको विभागासाठी या विनायक संतोष कोल्हे यांनीही जोडलेला अनुभवाचा दाखला बनावट असल्याचे समोर आले. अनुभव नसताना ठेका मिळवण्यासाठी महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाई करण्यात आली आहे. सातपूर व सिडको या दोन विभागांमध्ये अनुभवाचे बनावट दाखले जोडल्यामुळे तेथील प्रत्येकी एक सहभागी ठेकेदार बाद झाल्यानंतर आता स्पर्धात्मक टेंडरसाठी पुरेसे टेंडर न आल्यामुळे या दोन्ही ठिकाणी फेरटेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
तसेच पूर्व व पंचवटी विभागात शफियोद्दीन शेख, पश्चिम व सातपूर विभागात मे. सुजल एंटरप्रायजेस यांना काम देण्यात आले. त्यामुळे या चार ठिकाणचे ठेकेदार निश्चित झाले आहेत.