

नाशिक (Nashik): आंबेडकरी चळवळ घराघरांत नेणारे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मगावी देशवंडी (ता. सिन्नर) येथे स्मारकासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी सामाजिक न्याय विभागाने १३.६७ कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
या प्रशासकीय मान्यतेनुसार या स्मारकाच्या कामांसाठी तीन आर्थिक वर्षात टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाणार असून या आर्थिक वर्षात ४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून या स्मारकात अत्याधुनिक संग्रहालय, वामनदादा व आंबेडकरी चळवळीच्या साहित्याचे वाचनालय, बगिचा उभारण्यात येणार आहे. याशिवाय या स्मारकात लेझर शो करण्यात येणार असून त्यात वामनदादा कर्डक यांचा जीवनपट दाखवण्यात येणार आहे.
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे १९२२ मध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म झाला. त्यांनी डॉ. आंबेडकरांवर १० हजारांहून अधिक गीते रचली आहेत. लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शाहिरी जलशांमधून घराघरांत पोहोचवण्याचे काम महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात केले.
देशवंडी गावात वामनदादा कर्डक यांची ५६ गुंठे जमीन आहे. या जमिनी शेजारीच ग्रामपंचायतीचे २१ हेक्टर क्षेत्र आहे. या जागेवर वामनदादांचे स्मारक व्हावे यासाठी गावानेही एकमुखाने ठराव दिला आहे. यापूर्वी वामनदादा कर्डक यांचे स्मारक देशवंडीत उभारण्यात आले होते. मात्र, त्या स्मारकाची दुरवस्था झाली होती. यामुळे वामनदादा यांचे नवीन व भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी होती.
क्रीडा व युवकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या स्मारकासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याचा प्रस्ताव तयार करून तो सामाजिक व न्याय विभागाला पाठवला होता. माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत वामनदादा कर्डक यांच्या स्मारकासाठी हा निधी मंजूर केला आहे.
तीन वर्षांत मिळणार निधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत देशवंडी येथे लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक उभारण्यास १३.६७ कोटी रपये खर्चास प्रशासकीय मान्यता देताना २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०२६-२७ या वर्षातही ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानंतर २०२७-२८ या वर्षात ५.६७ कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.