नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलजीवन मिशन अंतर्गत ६८१ पाणी पुरवठा योजना पूर्ण आतापर्यंत ७०० कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र, त्यानंतरही जिल्हयातील टँकरने पाणी पुरवठा होत असलेल्या गावे व वस्त्यांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा लाख म्हणजे १७ टक्के लोकसंख्येला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनांची एवढ्या मोठ्या संख्येने कामे पूर्ण होऊनही टँकरची संख्या कमी न होण्याचे कारण काय, या प्रश्नाचे कोणाकडेही उत्तर नसल्याचे दिसत आहे.
केंद्र सरकारने देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन ही योजना सुरू केली आहे. ही योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्रात या मुदतीत ५० टक्के योजनांचीही कामे पूर्ण होऊ शकली नाही. नाशिक जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या १२२२ योजनांपैकी ३१ मार्चपर्यंत ६१७ योजना पूर्ण झाल्या होत्या व आतापर्यंत ती संख्या वाढून ६८१ झाली आहे. त्यातच मागील पावसाळ्यात जिल्हा सरासरीच्या केवळ सत्तर टक्के पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस टँकरची संख्या व गावे वस्त्यांची संख्या वाढत चालली आहे.
एकीकडे नाशिक जिल्हा परिषदेने ३१ माचपर्यंत ६१७ योजना पूर्ण केल्यानंतर १५ मेपर्यंत ६८१ योजना पूर्ण केल्या आहेत. मात्र, या पाणी पुरवठा योजनांची संख्या वाढत असताना टँकरची संख्या व टंचाईग्रस्त गावांची कमी होण्याचे नाव घेत नाही. यामुळे या पाणी पुरवठा योजनांच्या यशस्वीतेविषयी शंका निर्माण झाली आहे. या ६८१ योजना पूर्ण झाल्याने किती गावांमधील टँकरची संख्या कमी झाली, या प्रश्नाचे उत्तर जिल्हा परिषदेकडेही नाही. यामुळे योजनांची कामे पूर्ण झाली असली, तरी त्या गावांना प्रत्यक्ष पाणी पुरवठा होत आहे का, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मागील वर्षी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी पुरवठा योजना असलेल्या गावांमधील उद्भव विहिरींनी तळ गाठल्यामुळे तेथेही टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच जुन्या पाणी पुरवठा योजना केवळ गावठाण भागापुरत्या मर्यादित होत्या. त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील योजनांची कामे अद्याप सुरूही झालेली नसल्याने त्या गावांमधील वस्त्यांवर टँकर सुरू असल्याचे दिसत आहे.
...
जिल्ह्यातील टंचाईची स्थिती
टँकरदवारे पाणी पुरवठा : ३२१ गावे, ८२४ वस्त्या
टँकरची एकूण संख्या : ३५२
टँकरच्या रोजच्या फेर्या : ७४०
टँकरच्या पाण्याव अवलंबून लोकसंख्या : ६०१५१९