नाशिक : मांजरपाडाला ४६७ कोटी मिळाले पण किकवीला ३६ कोटी कधी मिळणार?

Nashik
NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : राज्य मंत्रिमंडळाने उर्ध्व गोदावरी प्रकल्पातील मांजरपाडा व त्याच्याशी संबंधित कामांसाठी १४९८ कोटी रुपयांची चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यात निव्वळ मांजरपाडा वळण योजनेला ४६७ कोटींची सुप्रमा मंजूर केली आहे. विधिमंडळ अधिवेशनात आमदार छगन भुजबळ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि जलसपंदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली आहे. नाशिकचे दत्तक पिता म्हणून स्वताच जाहीर केलेल्या देवेंद्र फडणवीस नाशिकच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवणारा व १३ वर्षापासून रखडलेला किकवी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वन विभागासाठी ३६.५७ कोटी रुपयांची एनपीव्ही रक्कम मंजूर करतील, अशी आशा अपेक्षा व्यक्त होत आहे.

Nashik
मुख्यमंत्री शिंदे मुकुंदनगरवासीयांना पावणार का? झोपलेली पालिका...

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे किकवी धरण प्रस्तावित करण्यात आले आहे. या धरणाची १५९६ दलघफू साठवण क्षमता असून ते सर्व पाणी नाशिक शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जाणार आहे. या प्रकल्पास राज्य सरकारने २६ ऑगस्ट २००९ रोजी २८३ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर ४ डिसेंबर २०१२ ला पाटबंधारे विभागाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक कार्यालयाकडून धरणाच्या आराखड्यास मंजुरीही दिली. त्यानंतर या धरणाच्या कामाबाबत काहीही प्रगती झालेली नाही.

Nashik
नाशिक जिल्ह्यातील 'ही' योजना मार्गी; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

नाशिक शहरास प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होत असून उर्वरित मुकणे व दारणामधून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणावर शेतीसाठी आरक्षण असल्यामुळे भविष्यातील वाढीव लोकसंख्येला गंगापूर धरण अपुरे पडणार आहे. दारणा धरणातून नाशिकला पाणीपुरवठा करण्यास मर्यादा असून मुकणे धरणातून केवळ १.५ टीएमसी पाणी आरक्षित आहे. यामुळे २०४१ पर्यंतच्या नाशिक शहराला पिण्याच्या पाणी पुरवण्यासाठी किकवी धरण प्रस्तावित करण्यात आले आहे. राज्यात २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर किकवी धरणाबाबत काहीही प्रगती झाली नाही. त्यानंतर २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर किकवी धरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. मात्र, त्याबाबत फारशी प्रगती झाली नाही.

Nashik
नाशिक शहरातील गावठाण होणार 'स्मार्ट'; 'स्काडा'द्वारे 24 तास...

राज्य सरकारच्या २०२२-२३ च्या अर्थकसंकल्पाच्या व्हाईटबुकमध्ये किकवी धरणाचा समावेश करून त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच किकवीचा सुधारित प्रकल्प अहवाल २०२१-२२ च्या दरसूचीनुसार तयार करून ११ जानेवारीस २०२२ रोजी तो राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्यात आला. तांत्रिक सल्लागार समितीने २७ एप्रिलला या प्रकल्पाबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहे. त्यानुसार धरणाचे काम सुरू करण्यापूर्वी वन विभागाकडे ३६.५७ कोटी रुपये एनपीव्ही रक्कम जमा करणे आवश्‍यक असल्याचे नमूद केले आहे. गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने यापूर्वीच वन विभागाला एनपीव्ही रक्कम देण्यासाठी निधीची तरतूद करावी, असे पत्र शासनास दिले आहे. यामुळे नाशिकमधील नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असलेल्या किकवी धरण प्रकल्प मार्गी लागण्यासाठी वनविभागाची ३६.५७ कोटी रुपये एनपीव्ही रक्कम भरली जाईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.

असा आहे किकवी प्रकल्प
ठिकाण : ब्राम्हणवाडे, ता. त्र्यंबक
उपलब्ध पाणी : १५९६ दलघफू
खोरे : गोदावरी
पाणलोट क्षेत्र : ७० चौ.किमी.
पिण्यासाठी पाणी : १५९६ दलघफू

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com