
नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. केंद्र व राज्य सरकारकडून निधीची मागणी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागणार आहे. हा प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी आता महापालिकेने सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जवळपास सात ते आठ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार करण्यासाठी महापालिका लवकरच टेंडर काढणार आहे.
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे 2027- 2028 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. या सिंहस्थाच्या तोंडावर नियोजन सुरू केल्यास पुरेशा सुविधा निर्माण होत नाहीत, तसेच कामांच्या दर्जाचा प्रश्न उपास्थित होतो. यामुळे सिंहस्थाचे नियोजन पाच वर्षे आधीपासून सुरू व्हावे यासाठी साधू महंत यांच्यासह या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने साधू महंतांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी महापालिकेला सूचना दिल्या. यामुळेमहापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बैठका सुरू केल्या आहेत. त्यांनी नुकतीच सिंहस्थ कुंभमेळा नियोजन समितीही घोषित केली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनीही सिंहस्थ आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिका व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. या सर्व तयारीनंतर महापालिकेने सिंहस्थ आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेची नियुक्ती करण्यासाठी विविध संस्थांकडून स्वारस्य देकार मागवले जाणार आहेत.
सिंहस्थासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त होतो. निधी मागणी नोंदविण्यापूर्वी प्रकल्प अहवाल सादर करणे बंधनकारक असते. मनुष्यबळाची कमतरता असल्याने महापालिकेने त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आराखडा तयार केल्यानंतर निधीची मागणीदेखील सल्लागार संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. सरकारशी पत्रव्यवहार करणे, पाठपुरावा करणे, शासनाकडे होणाऱ्या बैठकांमध्ये माहिती सादर करणे, कामांचा प्रगती अहवाल तयार करणे आदी कामे सल्लागार संस्थेला करावी लागणार आहे.