

नाशिक (Nashik): नाशिक शहरातील द्वारका चौक ते नाशिकरोड या दहापदरी मार्गाच्या कामास केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर नाशिक महापालिकेने २०२.७७ कोटींच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
सध्याच्या आराखड्यानुसार या मार्गावर दोन पूल उभारले जाणार असले, तरी सिंहस्थ कुंभमेळा समितीच्या शिखर परिषदेत आमदार देवयानी फरांदे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी या रस्त्यावरील प्रमुख चौकांमध्ये आणखी पूल उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे या मार्गाचे काम सुरू असताना त्याच्या आराखड्यात आणखी बदल होऊन आणखी काही पूल मंजूर होण्याची शक्यता दिसत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिक शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांच्या कामांचे टेंडर प्रसिद्ध झाले असून काही रस्त्यांच्या कामांना सुरवात सुद्धा झालेली आहे. त्यात द्वारका ते नाशिकरोड या रस्त्याचे कामास केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून निधी मिळावा म्हणून महापालिकेकडून प्रयत्न सुरू होते. अखेर केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने मागील महिन्यात या रस्त्याच्या कामास मंजुरी दिली. त्यानंतर आता महापालिकेने ६.४३५ किलोमीटर लांबीच्या दहा पदरी ४५ मीटर रुंदीच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
या टेंडरनुसार सध्याच्या अस्तित्वात असलेल्या २२ मीटर रस्त्यासह वाढीव २३ मीटर रस्त्याचे काम १२ महिन्यांमध्ये पूर्ण करायचे आहे. या कामामध्ये दोन पुलांचा समावेश करण्यात आला असून त्यातील एक उड्डाणपूल काठेगल्ली ते समाजकल्याण कार्यालय या भागात असणार आहे. या कामासाठी सर्व प्रकारचे कर वगळून २०२.७७ कोटी रुपये खर्च येणार आहे.
काम सुरू असताना कामात बदल?
द्वारका ते नाशिकरोड या मार्गावर चार वर्षापूर्वी भारतमाला योजनेंतर्गत सहा किलोमीटरचा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानंतर निओ मेट्रोसाठी डबलडेकर उड्डाणपुलाबाबत चर्चा घडवण्यात आल्या.
हे दोन्ही पूल मागे पडल्यानंतर महापालिकेने काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील प्रमुख चौकांमध्ये उड्डाणपूल प्रस्तावित केले होते. मात्र, त्यावेळी प्रस्तावांना मंजुरी न मिळाल्याने व आता केवळ कामासाठी १३ महिने उरल्याने महापालिकेने या ६.४३५ किलोमीटर लांबीचा दहापदरी रस्ता केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला होता. त्यानुसार दिल्ली येथे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण कार्यालयात फेब्रुवारीत बैठक झाली. त्यात महापालिकेने तांत्रिक सुधारणा करून २४४ कोटींच्या फेरप्रस्तावास मान्यता दिली.
त्यानुसार या कामाचे टेंडर प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच कुंभमेळा शिखर परिषदेत आमदार देवयानी फरांदे यांनी द्वारका ते नाशिकरोड या दहा पदरी रस्त्यावर प्रमुख चौकांमध्ये पूल नसल्यामुळे तेथे मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होणार असून एवढा मोठा रस्ता होऊनही वाहतूक कोंडीची समस्या तशीच राहणार असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना याबाबत विचारले असता त्यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने आम्ही प्रस्तवित केलेले पूल रद्द केले आहेत, असे सांगितले. मात्र, आमदार फरांदे यांनी या मार्गावरील प्रमुख चौकांमध्ये पुलांची गरज असल्याचे पुन्हा सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या कामासाठी केंद्रीय मंत्रालय निधी देणार नसेल तर आपण ते काम करू, पण आवश्यक कामे झाली पाहिजेत, असे महापालिका आयुक्तांना सांगितले.
यामुळे या मार्गावरील प्रमुख चौकांमध्ये गरजेनुसार पूल उभारण्यास मुख्यमंत्री तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या कामाचे टेंडर प्रसिद्ध् झाले असून त्यात आधी मंजुरी मिळाल्याप्रमाणे दोन पूल आहेत. या रस्त्यावरील प्रमुख चौकांमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता राज्य सरकारच्या निधीतून पुलांची उभारणी करण्याचा निर्णय झाल्यास या मार्गाचे काम सुरू असताना त्या कामांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.