Sand Depot
Sand DepotTendernama

Nashik : ठेकेदारांनी पाठ फिरवल्यामुळे नवीन वाळू धोरणाचा फज्जा; तिसऱ्यांदा रिटेंडर

Published on

नाशिक (Nashik) : नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव व मालेगाव या पाच तालुक्यांमधील २० वाळूघाटांसाठी जिल्हा खनिकरम विभागाने तिसऱ्यांदा फेरटेंडर प्रसिद्ध केले आहे. या टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. जिल्ह्यातील घाटांवर वाळूचे प्रमाण कमी असणे, स्थानिकांचा विरोध तसेच वाळूचा दर्जा कमी प्रतिचा असल्यामुळे ठेकेदार या वाळू लिलाव टेंडरकडे पाठ फिरवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रत्येक फेरटेंडरवेळी लिलावाची रक्कम २५ टक्के कमी करून टेंडर राबवण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे.

Sand Depot
Nashik : ‘हर घर नल से जल’ मार्च २०२४ पर्यंत अशक्य; जलजीवनच्या कामांना मुदतवाढ

राज्य सरकारने मागील वर्षी जाहीर केलेल्या नवीन वाळू धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांना ६०० रुपये ब्रास या दराने वाळू देण्याचा, तसेच घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. यात लाभार्थ्यांना केवळ वाहतूक खर्च करावा लागणार आहे. यामुळे या नवीन वाळू धोरणाचे राज्यात स्वागत झाले. नवीन वाळू धोरण राज्यात एक मे २०२३ पासून लागू करायचे होते, पण टेंडर प्रक्रिया पूर्ण न होऊ शकल्याने त्याचा मुहूर्त टळला. त्यासाठी नाशिक जिल्हयात १३ वाळू घाटांना परवानग्या देण्यात आल्या होत्या. मालेगाव तालुक्यात पाच, कळवण, देवळा, बागलाण या तीन तालुक्यांत आठ घाट व एकूण सहा डेपो निश्चित करण्यात आले होते. त्यातून ९० हजार मेट्रिक टन वाळूचा उपसा करण्यात येणार होता. मात्र, टेंडर प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे या धोरणाची नाशिक जिल्ह्यात अंमलबजावणी झाली नाही.

Sand Depot
Nashik : युवा महोत्सवासाठी महापालिकेने दुरुस्ती, रंगरंगोटी, सजावटीवर उधळले 35 कोटी

जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी केवळ निफाड तालुक्यातील चेहडी येथे वाळू डेपो सुरू झाला. मागील हंगामात टेंडरला प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा खनीकर्म विभागाने ऑक्टोबर २०२३ मध्ये फेरटेंडर प्रसिद्ध केले होते. त्या टेंडरप्रक्रियेला प्रतिसादा मिळाला नाही. यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाने फेरटेंडर राबवण्याचा निर्णय घेतला असून बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव व मालेगाव या पाच तालुक्यातील वाळू घाटांसाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. या टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. दरम्यान जिल्ह्याती वाळूची प्रतवारी घसरलेली असणे, वाळूचे प्रमाण कमी असणे, या प्रस्तावित केलेल्या वाळू घाटांना स्थानिकांचा विरोध आहे. यामुळे ठेकेदार या लिलाव प्रक्रियेपासून दूर राहत असल्याचे सांगितले जात आहे.  या टेंडरला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाला प्रत्येक फेरटेंडरच्या वेळी वाळू घाटांची ऑफसेट किंमत २५ टक्क्यांनी कमी करण्याची नामुष्की ओढावली आहे. यातून शासनाच्या तिजोरीलाही फटका बसतो आहे.

या वाळू घाटांच्या लिलावासाठी टेंडर...
बागलाण : धांद्री, नामपूर, द्याने,
कळवण : देसगाव, नाकोडे, कळवण ब्रु., वरखेडा, पाळे खुर्द.
देवळा : ठेंगोडा बंधारा
नांदगाव : न्यायडोंगरी
मालेगाव : पाटणे, चिंचावड, आघार खुर्द, येसगाव बुद्रूक, सवंदगाव, सावतावाडी, वडनेर, वळवाडी, अजंग

Tendernama
www.tendernama.com