नाशिक जिल्ह्यात लोकसहभागातून साडेचार हजार वनराई बंधारे

Bandhara
BandharaTendernama

नाशिक (Nashik) : जिल्ह्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, आणखी महिनाभर ओढे व नाले प्रवाहित राहण्याचा अंदाज आहे. हे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा सिंचनासाठी वापर करण्यासाठी राज्य कृषी विभागाने वनराई बंधारे बांधण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सहभागातून कृषी विभागातर्फे ४५७० वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या वनराई बंधाऱ्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना फायदा होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

Bandhara
कोयना प्रकल्पाची सुरक्षा ‘सीआयएसएफ’कडे; खर्चाचा बोजा वीज बिलातून

नाशिक जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून नेहमी अवर्षणग्रस्त राहणाऱ्या सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड मालेगाव, देवळा तालुक्यांमध्ये सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अनेकदा मुसळधार पाऊस झाला. यामुळे या तालुक्यांमधील सर्व नदी, नाल्यांना पूर आले. या तालुक्यांमधील नाले, ओढे आणखी महिनाभर प्रवाहित राहण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने यावर्षी राज्यभरात कृषी सहायकांनी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे निर्देश दिले आहेत. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले नाशिकला विभागीय आयुक्त असतानाही त्यांनी विविध विभागांच्या समन्वयातून वनराई बंधारे बांधण्याची संकल्पना राबवली होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व कृषी विभाग या संकल्पनेशी परिचित आहे. यामुळे कृषी विभागाने या वाहून जाणाऱ्या पाण्याचा रब्बी हंगामागातील क्षेत्र वाढवण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून जिल्ह्यात ४५७० वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या वनराई बंधाऱ्यांमुळे १५ तालुक्यांतील सहा हजार ४८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

Bandhara
शिंदे साहेब, हे बरं नव्हं! उद्घाटनापूर्वीच केला 'समृद्धी'चा वापर?

असे बांधतात वनराई बंधारे
नवराई बंधारे बांधण्यासाठी सिमेंट अथवा खतांची रिकम्या गोणीत माती अथवा वाळू भरून त्या गोणींनी नाले-ओढ्यांचा प्रवाह अडवला जातो. एक वनराई बंधारा बांधण्यासाठी साधारणपणे आठ दिवस लागतात. नाला-ओढ्याच्या अरुंद भागात व उताराच्या जागेत वनराई बंधारा उभारला जातो. तसेच वनराई बंधाऱ्याची उंची दीड मीटरपेक्षा अधिक नसते. एका नाल्यावर अशा जागा असलेले कितीही वनराई बंधारे बांधता येतात. यामुळे वाहून जाणारे पाणी थोपून राहते व ते जमिनीत मुरण्यास मदत होते. यामुळे भूजलपातळी वाढते. पाणलोट विकासाची कामे सुरू नसलेल्या गावांमध्ये वनराई बंधारा बांधल्यास पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दिलासा मिळणार आहे. वनराई बंधारे लोकसहभागातून व अत्यंत कमी खर्चात बांधले जातात व अधिकाधिक पाणी साठवले जाते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com