अजितदादांनी का केली थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार?

Ajit Pawar: पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊनही प्रशासन ढिम्म
Ajit Pawar
Ajit PawarTendernama
Published on

पुणे (Pune): औंधमधील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या पोलिस कार्यालयासंदर्भात महापालिकेने सातत्याने पाठपुरावा करूनही ती हटण्याची चिन्हे नाहीत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊनही काम मार्गी लागले नाही. अखेर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच गृहसचिव व पोलिस महासंचालकांना धारेवर धरत कार्यालये तत्काळ हटविण्यास सांगितले.

Ajit Pawar
समृद्धी महामार्ग विसरा! आता मुंबई-नागपूर फक्त 2 तासांतच

औंधमधील ब्रेमेन चौक ते राजीव गांधी पुलादरम्यानचा बहुतांश रस्ता ३६ मीटरचा झाला आहे. मात्र, औंध पोलिस चौकी व त्यासमोरील विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन कार्यालय व अन्य एका वास्तूचा रस्ता रुंदीकरणात अडथळा येत आहे.

मागील एक ते दीड वर्षापासून महापालिका प्रशासनाकडून कार्यालय स्थलांतरित करण्यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. त्या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, अपघातात एकाला जीव गमवावा लागला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोनदा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कार्यालये हटविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणीही केली होती. त्यानंतरदेखील कार्यालये स्थलांतरित झालेली नाहीत.

Ajit Pawar
साडे तीन हजार कोटींच्या नव्या एक्सप्रेस-वेला राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल

महापालिकेने पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केला. पुणे पोलिसांनीही पाहणी करून गृह विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी पुन्हा कार्यालय हटविण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केल्या. पवार यांनी पोलिस प्रशासनाला दोनदा सांगूनही कार्यालये हटविली नाहीत. औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवडला जाणाऱ्या लाखो वाहनचालकांना दररोज याच ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, तरीदेखील कार्यालये स्थलांतरित केली नाहीत.

अखेर पवार यांनी शनिवारी पुणे पोलिसांच्या शिवाजीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच पोलिसांना धारेवर धरले. दरम्यान, राज्य सरकारकडून कार्यालये स्थलांतरित करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. ही कार्यालये बाणेरमधील महापालिकेच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केली जाणार आहेत, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Ajit Pawar
CIDCO: अतिश्रीमंत सिडकोच्या तिजोरीवर कोणाचा आहे डोळा?

पोलिसांची कानउघाडणी
‘‘बंडगार्डन पोलिस ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतरित करणे आणि औंधमधील रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणारी पोलिस कार्यालय हटविण्याची सूचना पोलिस महासंचालक रश्‍मी शुक्‍ला यांना दिली होती. त्यांनी प्रस्ताव पुढे पाठविल्याचे सांगितले. काम तत्काळ झाले पाहिजे,’’ अशा शब्दांत पवार यांनी पोलिसांची कानउघाडणी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com