
पुणे (Pune) : पुणे हे सध्या राज्यातील सर्वांत मोठे शहर असले तरी, पिंपरी-चिंचवड येत्या तीन दशकांमध्ये पुण्याला मागे टाकणार, असा अंदाज आहे. आता पुणे हे विकासाची कमाल मर्यादा गाठण्याच्या जवळ असून भविष्यातील विकासाचा केंद्रबिंदू पिंपरी-चिंचवड असेल, असे ‘महामेट्रो’च्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात मांडण्यात आले आहे.
हा आराखडा तयार करताना त्यामध्ये भविष्यातील वाहतुकीचे नियोजन करताना कोणत्या भागात लोकसंख्या वाढीचा वेग अधिक राहील, यांचा अंदाज बांधण्यात आला आहे. राज्य सरकारने २०२० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागू केलेल्या ‘एकात्मिक बांधकाम विकास व प्रोत्साहनपर नियमावली’त (युडीसीपीआर) चारपर्यंत ‘एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) वापरून बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना रस्तारुंदीचे बंधन त्यास घालण्यात आले आहे. पुणे शहरातील रस्त्यांच्या लांबी आणि रुंदी विचारात घेतली तर, या नियमावलीनुसार पूर्ण ‘एफएसआय’ वापरून बांधकाम करणे शक्य होत नाही. त्यामुळेच यापुढील काळात पुण्याच्या वाढीवर मर्यादा येणार आहे. या उलट पिंपरी-चिंचवड शहराच्या विकास आराखड्यात शहर व परिसरात असलेली मोकळी जागा आणि पुरेशा प्रमाणावर रस्त्यांची रुंदी असल्यामुळे तेथे ही समस्या जाणवत नाही. त्यामुळे या शहरातील लोकसंख्या वाढीची अधिक शक्यता आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालातील निष्कर्षांवरून पुण्याच्या राज्यकर्त्यांमध्ये असलेल्या दूरदृष्टीच्या अभावाचा फटका शहराला बसणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
अशी आहे स्थिती
१) पुणे महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ ५१९ चौरस किलोमीटर तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेची क्षेत्रफळ १८१ चौरस किलोमीटर
२) पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जवळपास तिप्पट. तरीदेखील पुणे शहराच्या वाढीला या पुढील काळात मर्यादा येणार
३) लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेतला तर २०५४ मध्ये पुणे शहराची लोकसंख्या जवळपास ७१ लाखांच्या जवळपास असेल. तेव्हा पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ही ७७ लाख असेल
महत्त्वाचे
- पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या सुमारे २ हजार ५५० चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील वाहतुकीचा सर्वंकष आराखडा ‘महामेट्रो’कडून तयार
- त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात लोकसंख्या पुण्यापेक्षा अधिक असेल. यामागील कारणेही या अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे.
- त्यामध्ये प्रामुख्याने पुणे शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत रस्त्याखाली क्षेत्रफळ हे कमी आहे. जे रस्ते आहेत त्यामध्ये सहा आणि नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. तर २४, ३० आणि ४५ मीटर रुंदीच्या रस्ते एकूण शहराच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत सहा टक्केच आहे
- पिंपरी-चिंचवड शहरात २४, ३० आणि ४५ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे प्रमाण हे शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत जवळपास साडेसोळा टक्के इतके आहे
दर दहा वर्षनिहाय लोकसंख्या कशी असेल (आकडेवारी लाखांत)
शहराचे नाव------ २०२४---------२०३४-----------२०४४----------२०५४
पुणे शहर-------४६.२७---------५४.२५--------------६९.२७..........७१.८१
पिंपरी-चिंचवड------३३.६९-------४८.४८----------६६.०५...........७७.१९
मिसिंग लिंकची माहिती
१) पुणे शहरात ४५९ किलोमीटर लांबीचे सुमारे ६७८ मिसिंग लिंक रस्ते
२) पिंपरी-चिंचवड शहरात ९३ किलोमीटर लांबीचे सुमारे २३१ मिसिंग लिंक रस्ते