
पुणे (Pune) : सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने अपघात टाळण्यासाठीच्या वरंधा घाट रस्ता ३० सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट परिसराच्या भोर हद्दीतील सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे क्षेत्र हे दरड प्रवण आहे. तसेच या भागात पावसाचे प्रमाणही जास्त आहे. यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती होऊन दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळणेसाठीच्या उपाय योजना करण्यासाठी घाट रस्ता ३० सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
भोर उपविभागीय अधिकारी यांनी भोर तहसीलदार व भोर पोलिस निरीक्षक यांच्याकडून मागविण्यात आलेल्या अहवालानुसार राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी या रस्त्यावरील जिल्ह्यात रंदीकरणाचे काम हाती घेतले असून, हे क्षेत्र हे दरड प्रवण आहे.
तसेच सद्यःस्थितीत मुसळधार पाऊस सुरू आहे. भोर-महाड या मार्गावर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दरडी कोसळण्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी वरंधा घाट रस्ता ३० सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहनांच्या वाहतुकीकरीता पूर्णतः बंद करण्याबाबत नमूद केले आहे.
त्यानुसार या महामार्गालगत डोंगराळ भाग असून, हा भाग सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येत आहे. त्यामुळे अतिवृष्टी होणे व दरड कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे जीवितहानी होण्याचा धोका आहे. म्हणून हा ३० सप्टेंबरपर्यंत भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीबाबतच्या रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट काळात सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी वरंधा घाट रस्ता बंद करण्यात आला आहे.
या पर्यायी मार्गांचा वापर करावा
वरंधा घाट ३० सप्टेंबर पर्यंत बंद करण्यात आल्याने वाहतूक माणगाव-निजामपूर-ताम्हिणी घाट मुळशी पिरंगुट-पुणे, राजेवाडी फाटा-पोलापूर-महाबळेश्वर-वाई-सुरुर-सातारा-कराड-कोल्हापूर अथवा राजेवाडी पाटा-पोलादपूर-खेड- चिपळून- पाटण-कराड कोल्हापूर या पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.