
पिंपरी (Pimpri) : निगडी ते तळवडे मार्गाने जायचे म्हटले की, त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक कोंडीत अडकणार हे निश्चित असायचे. मात्र, आता येथील वाहतूक कोंडी फुटली आहे. त्रिवेणीनगर चौकातील रस्त्याचे रुंदीकरण झाले असून, वाहतूकही सुरू झाली आहे. प्रशस्त रस्त्यामुळे वाहतूक कोंडी न सुरळीत वाहतूक झाल्याने वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निगडी-तळवडे मार्गावर तळवडे आयटी पार्क, देहू तीर्थक्षेत्र, एमआयडीसी तसेच रहिवासी परिसर असल्याने या मार्गाने जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. दरम्यान, त्रिवेणीनगर चौकात पूर्वी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व्हायची. यासह तळवडेकडून निगडीच्या दिशेने येताना या चौकात तीव्र वळण असल्याने मोठ्या गाड्यांना थोड्या दूर अंतरावरून वळण घ्यावे, लागायचे. यामुळे येथील वाहतूक वाहतूक मंदावून व वाहतूक कोंडीत आणखी भर पडायची. यासह, भक्ती-शक्ती चौक ते मोशी स्पाईन रस्ता हा रस्ता जोडण्यासाठी त्रिवेणीनगर चौक परिसरातील भूसंपादन विषय अनेक दिवसांपासून रखडल्याने हा मार्गही जोडला जात नव्हता. मात्र, काही काही महिन्यांपूर्वीच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले. युद्धपातळीवर हे काम सुरू होते. हा रस्ता पंचेचाळीस मीटर रुंद केला असून, या चौकात दोन आयलँड उभारले आहेत. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत झाली असून, वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कामानिमित्त अनेकदा या रस्त्याने ये-जा करावी लागते. पूर्वी त्रिवेणीनगर चौकात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागायचे. या कोंडीत अडकून पडल्यास पुढे कामाला जाण्यास उशीर व्हायचा. मात्र, आता हा रस्ता खूप प्रशस्त झाला आहे. वाहतूक कोंडी नसल्याने वेळ वाचतो.
- विकास पागिरे, नागरिक
त्रिवेणीनगर चौकातील रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. सध्या हा मार्ग वाहतुकीसाठी खुला असून, येथील वाहतूक सुरळीत झाली आहे. काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बदल केले जात आहेत. पूर्वी दुर्गानगर चौकाकडून तळवडेकडे जाण्यासाठी वाहनांना काही अंतरावर वळसा मारावा लागत होता. तोही आता कमी झाला आहे.
- विश्वनाथ खुळे, पोलिस निरीक्षक, निगडी वाहतूक विभाग
येथील भूसंपादन झाल्यानंतर लगेचच रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. रस्त्याचे काम पूर्णत्वास आले असून, सिग्नल, दिशादर्शक फलक उभारणे यासह आणखी थोडीफार कामे राहिली आहेत. ही कामे देखील लवकरच पूर्ण केली जातील. या रस्त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे.
- विजय भोजने, कार्यकारी अभियंता, महापालिका