.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : हडपसर परिसरात विविध ठिकाणच्या एकेरी मार्गांवर विरुद्ध दिशेने वाहतूक होत आहे. वाहनचालकांचा होणारा उलटा प्रवास कुठे जीवघेणा, तर कुठे वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे. पोलिस आयुक्तांनी महिनाभरापूर्वी अशा वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश देऊनही येथील विरुद्ध दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांवर अद्यापही नियंत्रण येऊ शकले नाही. त्यामुळे या भागात छोट्या-मोठ्या अपघातांसह वारंवार कोंडी होत आहे.
हडपसर परिसरात ठिकठिकाणी विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह इतर नागरिकांना भीतीच्या सावटाखाली जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महिनाभरापूर्वी या वाहतुकीची गंभीर दखल घेतली होती. तसेच या वाहनचालकांची वाहने सहा महिन्यांकरिता जप्त करण्याचा नियमही त्यांनी केला होता. यानंतर पहिले १५ दिवस शहरात सर्वच ठिकाणच्या वाहतूक पोलिसांनी या नियमाची कडक अंमलबजावणीही केली होती. हडपसर परिसरातही वाहतूक पोलिसांकडून अशा कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे.
या बेशिस्त वाहतुकीमुळे मगरपट्टा चौक व सातववाडी, गोंधळेनगर येथील सासवड रस्ता परिसरात काही दिवसांपूर्वी दोन वेळा अपघातही झाले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू मार्केटच्या दोन्ही बाजूला असलेल्या एकेरी मार्गांवर सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी सर्रास विरुद्ध वाहतूक होते. यामध्ये विशेषतः रिक्षा व दुचाकीचालकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे येथे वारंवार कोंडी होते. हांडेवाडी व महंमदवाडी रस्त्यावरही हीच परिस्थिती आहे. बनकर क्रीडा मैदानाकडून मगरपट्टा रस्त्याने विरुद्ध दिशेने अनेक वाहने मगरपट्टा साउथ गेट चौकात येतात. त्यामुळे तेथेही इतर वाहनांना कोंडीत अडकावे लागते. मगरपट्टा चौक व चंद्रमौलेश्वर महादेव मंदिरापासून सम्राट गार गार्डनकडे या वाहनांचा वेगही जास्त असल्याने वारंवार अपघाताची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनचालकांवर वेळोवेळी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
येथे होतो उलटा प्रवास
सय्यदनगर, हांडेवाडी रस्ता, पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडईलगतचे दोन्ही एकेरी मार्ग, मगरपट्टा चौक, मगरपट्टा साउथ गेट चौक, मुंढवा रेल्वे उड्डाणपुलालगत रासकर चौक, सातववाडी-गोंधळेनगर येथील सासवड रस्ता, सोलापूर रस्त्यावरील रुकारी पंप, जॉयविला, शेवाळवाडी फाटा चौक, अण्णासाहेब मगर विभागीय बाजार समितीसमोरील रस्ता
गेल्या महिनाभरात अशा प्रकारे विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या सुमारे ८०० ते ९०० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी पोलिस नियंत्रकाची नेमणूक केली जात आहे.
- राजेश खांडे, वाहतूक पोलिस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा