
भोसरी (Bhosari) : भोसरीतील आळंदी रस्त्यावरील कै. श्री ज्ञानेश्वर (माऊलीदादा) सोपानराव गवळी वाहन तळाला बुधवारी (ता. १९) महापालिकेद्वारे पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन हे वाहन तळ येत्या दोन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोसरीतील आळंदी रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
भोसरीतील आळंदी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ वसली आहे. त्यातच या रस्त्यावर विविध विक्रेत्यांनी हातगाड्या लावल्या आहेत. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. पूर्वी महापालिका आणि भोसरी वाहतूक विभागाद्वारे या रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे नियोजन केले होते. मात्र काही काळानंतर त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
या रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी कै. सखूबाई गवळी प्रवेशद्वारासमोरील जागेत महापालिकेने चार मजली कै. श्री ज्ञानेश्वर सोपानराव गवळी वाहनतळ उभारले आहे. या वाहनतळात दीडशे दुचाकीबरोबरच ७५ चार चाकी वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहन तळाचे काम पूर्ण झाले असून भूमिजिंदगी विभागाकडे हस्तांतराची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.
वाहनतळ सुरू झाल्यास
भोसरीतील आळंदी रस्त्यावरील कै. श्री ज्ञानेश्वर (माऊलीदादा) सोपानराव गवळी वाहनतळ सुरू झाल्यावर आळंदी रस्त्यावर नो पार्किंग झोन सुरू करणार असल्याची माहिती भोसरी पोलिस वाहन विभागाद्वारे देण्यात आली. त्याचप्रमाणे या रस्त्यावरील हातगाडीवाले व पथारीवाले यांनाही रस्त्याच्याकडेला बसण्यास मनाई केल्यास या रस्त्यावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात दूर होऊ शकते.
महापालिकेच्या इमारत बांधकाम विभागाद्वारे भोसरीतील वाहन तळाला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. आता या वाहन तळाचा ताबा भूमिजिंदगी विभागाकडे देण्यात येणार आहे.
- शिवराज वाडकर, कार्यकारी, स्थापत्य विभाग, ई प्रभाग क्षेत्रीय कार्यालय
वाहन तळ सुरू करण्याचा व निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्यांना आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाद्वारे भोसरीतील वाहन तळ भूमिजिंदगी विभागाकडे हस्तांतरित झाल्यावर भूमिजिंदगी विभागाद्वारे त्याची नोंदणी करून ते पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेच्या ई क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.
- मुकेश कोळप, सहायक आयुक्त, भूमिजिंदगी विभाग, महापालिका.
भूमिजिंदगी विभागाकडून वाहन तळाचा ताबा मिळाल्यावर वाहनांच्या पार्किंगचे दर ठरवून ते चालविण्यास देण्यासाठी निविदा काढली जाईल. योग्य ती प्रशासकीय कार्यवाहीनंतर हे वाहन तळ सुरू केले जाईल. यासाठी साधारण दोन महिने लागू शकतात.
- राजेश आगळे, ई प्रभाग क्षेत्रीय अधिकारी.