
पुणे (Pune): वाकडेवाडीतील पीएमसी वसाहतीतील रहिवाशांच्या पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने न झाल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महापालिकेने या वसाहतीच्या पुनर्विकासाचा निर्णय अनेक वर्षांपूर्वी घेतला होता. टेंडर प्रक्रिया पूर्ण करून विकासकाची नियुक्तीही झाली होती; परंतु अपघात, अडथळे आणि प्रशासनातील विलंबामुळे प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही.
स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत फेरटेंडर प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. महापालिकेने प्रकल्पासंबंधी सर्व मान्यताप्रक्रिया पूर्ण केल्या असूनही गेल्या काही वर्षांपासून काम ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांना कायमस्वरूपी घरे मिळत नसल्याने ते प्रचंड अडचणीत सापडले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
माजी नगरसेविका सोनाली लांडगे म्हणाल्या की, महापालिकेने मुदतीत ठोस निर्णय न घेतल्यास नागरिकांना आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. नागरिकांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन प्रकल्प प्रत्यक्षात सुरू करावा. फेरटेंडर प्रक्रिया राबवून नागरिकांना लवकरात लवकर पक्की घरे बांधून देण्यात यावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिली होता.