
लोणावळा (Lonavala): लोणावळ्यातील बस स्थानकाचे रुपडे लवकरच पालटणार आहे. पुणे आणि मुंबई या मार्गावर बस प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर येणारे लोणावळा बस स्थानक त्यामुळेच महत्त्वाचे स्थान आहे. या बस स्थानकाला आधुनिक स्वरुप दिले जाणार असून, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे. (MSRTC Lonaval Bus Stand Pratap Sarnaik News)
लोणावळ्यासह पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे, कोरेगाव भीमा येथील बस स्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी - MSRTC) मालकीच्या जमिनीच्या भूखंडावर सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर व्यावसायिक सुविधांसह ‘एमएसआरटीसी’ आस्थापनांचा विकास होणार आहे.
लोणावळा बस स्थानकाचा आधुनिक ‘बस पोर्ट’च्या धर्तीवर विकास होणार असून, ते सध्या टेंडर (Tender) प्रक्रियेत आहे. लवकरात मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
लोणावळा बसस्थानकास सोमवारी सरनाईक यांनी भेट दिली. त्यांनी तेथे प्रवासी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. स्थानकावरील स्वच्छता, सुरक्षा व इतर सोयी-सुविधांचे निरीक्षण केले. तेथे असलेल्या प्रसाधनगृह आणि उपहारगृहाची देखील पाहणी केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाव्यवस्थापक (नियोजन व पणन) जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हनकर, विभाग नियंत्रक अरुण सिया व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सरनाईक म्हणाले, ‘‘लोणावळ्यातील होणाऱ्या नियोजित स्थानकात स्वच्छतागृहे, कॅफेटेरिया, हॉटेल, वाहनतळ, व्यावसायिक सुविधांसह एक सुसज्ज संकुल उभारण्यात येणार आहे. तसेच सर्वच स्थानकांत प्रवाशांची स्वच्छ, टापटीप बसस्थानक, निर्जंतुक प्रसाधनगृहे आणि वाजवी दरात खाद्यपदार्थ मिळतील, असे उपाहारगृह असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने स्थानिक एसटी प्रशासनाने कार्यवाही करावी.’’
प्रवाशांच्या तक्रारी
काही प्रवाशांनी लोणावळा बसस्थानकावर वेळापत्रकानुसार अनेक नियोजित बस येत नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ बसची वाट बघावी लागते, अशी तक्रार केली. या तक्रारींची दखल घेत याबाबत उपस्थित पुणे प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापकांना सर्व बस वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकावर आल्या पाहिजेत, अशी सूचना सरनाईक यांनी यावेळी केली.