
पुणे (Pune) : जिल्हा परिषदेच्या टेंडर (Tender) प्रक्रियेत बेशिस्तपणा दाखविणाऱ्या ५४ ठेकेदारांवर (Contractors) कारवाई करत त्यांना काळ्यायादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली असून, आता अनामत रक्कम न भरणे किंवा कामाचा दर्जा घसरण्याकडे दुर्लक्ष केल्यास अशा ठेकेदारांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समिती, नागरी सुविधा, जनसुविधांमधून होणाऱ्या कामांसाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाते. सध्या विविध विकासकामांसाठी टेंडर मागविण्यात आल्या असून, सुमारे दीड हजार नोंदणीकृत ठेकेदार त्यात सहभागी झाले आहेत. त्यात सुरक्षित बेरोजगार अभियंत्यांचाही समावेश आहे.
टेंडर मंजुरीनंतर एक आठवड्याच्या आत अनामत रक्कम भरावी लागते, हा नियम असूनही अनेक ठेकेदारांकडून सातत्याने नियमभंग केला जात आहे. सुरुवातीला आठवड्याची मुदत देऊनही रक्कम न भरल्याने त्यांना आणखी एक संधी देण्यात आली. मात्र तरीही ५४ ठेकेदारांनी रक्कम न भरल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांची नावे काळ्यायादीत समाविष्ट केली आहेत.