
पुणे (Pune) : पुणे महापालिकेत (PMC) कंत्राटी सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करण्यासाठी १३९ कोटींची टेंडर काढली असताना जुन्या टेंडरमधील २२८ सुरक्षा रक्षकांना मार्च महिन्याचा पगार अजूनही मिळालेला नाही. महापालिकेने मे इगल सिक्युरिटी ॲण्ड पर्सोनल सर्व्हिसेस प्रा. लि. या ठेकेदाराला शनिवारपर्यंत (ता. ३) पगार करा अन्यथा काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशा इशारा दिला होता.
पुणे महापालिकेत दरवर्षी १५६५ सुरक्षा रक्षकांसाठी टेंडर काढली जाते. गेल्यावर्षी ही टेंडर तीन ठेकेदारांमध्ये विभागातून दिली होती. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच कंपनीकडून सुरक्षा रक्षक घेतल्यानंतर त्या एजन्सीची तारांबळ उडते. त्यामुळे गेल्यावर्षी तीन कंपन्यांना सुरक्षा रक्षकांची टेंडर वाटून दिली होती. यामध्ये इगल या कंपनीकडून २२८ कंत्राटी कामगार घेण्यात आले आहेत.
ठेकेदारांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पगार करणे बंधनकारक आहे. इगल या कंपनीने २२८ कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दिलेले नाही. आता एप्रिल महिनाही संपला आहे. त्यामुळे दोन महिन्याचे वेतन कामगारांना न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या २२८ सुरक्षा रक्षकांमध्ये ५० टक्के महिला आहेत तर, जवळपास १५ तृतीय पंथींचा समावेश आहे.
कंपनीने वेळेवर वेतन द्यावे यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जात आहे, पण त्यांना दाद दिली जात नाही. तसेच या कंपनीला नोटीसही बजावली असून, दंडही केला आहे. तरीही कामात कोणतीही सुधारणा नाही.
सुरक्षा अधिकारी राकेश विटकर म्हणाले, ‘‘इगल कंपनीला नोटीस बजावून, दंड करूनही त्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार केलेला नाही. या कंपनीचे अधिकारी आमचा फोनही घेत नाहीत. त्यामुळे त्यांना तीन मे पर्यंत पगार जमा न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई प्रस्तावित केली जाईल, अशी नोटीस बजावली आहे. उर्वरित दोन एजन्सीने कर्मचाऱ्यांचे पगार केले आहेत, पण इगलने मार्च महिन्याचा पगार अजूनही केलेला नाही.’’