
पुणे (Pune) : नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रांच्या आरक्षणासाठी महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने सुरू केलेल्या ‘रंगयात्रा’ ॲपला पहिल्याच खेपेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
महापालिका मालकीच्या नाट्यगृहांमध्ये मे ते ऑगस्ट या कालावधीतील आरक्षणासाठी ऑनलाइन पद्धतीने ६२५ अर्ज आले आहेत.
नागरिकांना सांस्कृतिक केंद्र आणि नाट्यगृहांचे आरक्षण घरबसल्या करता यावे, यासाठी ‘रंगयात्रा’ ॲपची सुरुवात केली. नाट्यगृहांच्या सत्रांचे वाटप चौमाही पद्धतीने होत असल्याने १ मे ते ३१ ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीसाठीचे अर्ज २५ मार्चपर्यंत मागविण्यात आले होते.
मात्र पहिल्यांदाच ॲपची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ऑनलाइन आणि प्रत्यक्ष (ऑफलाइन) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज मागविले होते. विशेष म्हणजे प्रत्यक्ष अर्जांपेक्षा ऑनलाइन पद्धतीने आलेल्या अर्जांची संख्या अधिक आहे.
चार महिन्यांसाठी ११३५ अर्ज
चार महिन्यांच्या कालावधीसाठी ११३५ अर्ज आले आहेत. यात ६२५ अर्ज ऑनलाइन पद्धतीने आले आहेत; तर ५१० अर्ज प्रत्यक्ष जमा केले आहेत. ऑनलाइन पद्धतीने आलेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक २२४ अर्ज बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहासाठी आहेत. त्यापाठोपाठ कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी २०८ अर्ज आले आहेत.
सर्वांत कमी म्हणजे ७ अर्ज येरवड्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिरासाठी आले आहेत. दरम्यान ऑनलाइन पद्धतीचे दोन अर्ज बाद करण्यात आले आहे.
१० एप्रिलपर्यंत वाटप?
आता आलेल्या अर्जांची वर्गवारी करून सत्रांचे वाटप केले जाणार आहे. यापूर्वी ऑफलाइन पद्धतीत ज्या पद्धतीने सत्रांचे वाटप होत असे, त्याच पद्धतीने ऑनलाइन पद्धतीतही केले जाणार आहे. एका सत्रासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास नाटकांना प्राधान्य दिले जाणार असून नाटक नसल्यास सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे. १० एप्रिलपर्यंत हे वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन पद्धतीने मागविलेल्या अर्जांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ॲपवर प्रत्येक नाट्यगृहाची आसनक्षमता नमूद केल्यामुळे नागरिकांना आपल्या कार्यक्रमासाठी योग्य नाट्यगृह निवडणे, सोपे झाले आहे.
- राजेश कामठे, प्रशासन अधिकारी- सांस्कृतिक विभाग
ऑनलाइन पद्धतीने आलेले अर्ज
- बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता- २२४
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड- २०८
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, सातारा रस्ता- ७४
- गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट- २३
- महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी- २१
- विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर- १९
- पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता- ३२
- पं. भीमसेन जोशी कलामंदिर, औंध- १५
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिर, येरवडा- ७