
पुणे (Pune) : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौकात (Chandani Chowk) सुमारे ३९७ कोटी रुपये खर्चून रॅम्प व सेवा रस्त्याचे जाळे उभे केले. मात्र या जाळ्यात आता वाहनचालकच अडकत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी दिशादर्शक फलक लावले नसल्याने वाहनचालकांना कोणता रस्ता, कुठे जातो हेच समजत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. अनेकांचे रस्ते चुकत आहेत. एक रस्ता जरी चुकला तरी वाहनचालकांना किमान दोन ते तीन किलोमीटरचा फेरा पडतो आहे. यामुळे वाहनचालकांत प्रचंड नाराजी पसरली आहे.
याठिकाणी १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले असून, यात दोन सेवा रस्ते, अंडरपास व रॅम्पचा समावेश आहे. रस्त्यांचे जाळे तयार झाल्याने वाहतूक कोंडी कमी झाली आहे. पण येथे फलकच नसल्याने वाहनचालकांना मार्ग कळत नाही. परिणामी त्यांचा मार्ग चुकत आहे. प्रामुख्याने वारज्याहून मुळशी व बावधनला जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच कोथरूडहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यांवर फलक नसल्याचा फटका मोठ्या प्रमाणात वाहनचालकांना बसत आहे. हीच परिस्थिती अन्य रॅम्प वा रस्त्यांवर आहे.
काम ९० टक्के पूर्ण
चांदणी चौकातील दोन सेवा रस्ते, आठ रॅम्प, २ भुयारी मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. केवळ एनडीए चौक ते बावधन यांना जोडणाऱ्या नवीन पुलाचे काम होणे बाकी आहे. येथील एकूण प्रकल्पापैकी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ पुलाचे व पुलाशी निगडित असणाऱ्या दोन रॅम्पचे १० टक्के काम बाकी आहे. हे सर्व काम पूर्ण होण्यास दीड ते दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर चांदणी चौकातील वाहतूक सुसाट होईल.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सेवा रस्त्यासह रॅम्पचा वापर वाहतुकीसाठी खुला केला आहे. यात साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्याचा समावेश आहे. तर मुंबईहून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या सेवा रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, येत्या काही दिवसांत तो देखील वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. महत्त्वाचे रस्ते व रॅम्प वाहतुकीसाठी खुले झाल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी झाले आहे.
अजूनही रस्त्याचे काम सुरू आहेत. मात्र तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीचे मार्ग वळविले जातात. त्यामुळे मोठ्या आकाराचे व कायमस्वरूपाचे फलक लावलेले नाही. मात्र येत्या आठ दिवसांत ते लावले जातील.
- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे