
पुणे (Pune) : पावसाळाजवळ आल्याने महापालिकेने (PMC) रस्तेखोदाई बंद करून दुरुस्तीवर भर दिलेला असताना बांधकाम व्यावसायिक, खासगी ठेकेदारांकडून (Contractor) परस्पर रस्तेखोदाई केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांना ९२ लाख रुपयांचा दंड केला आहे.
महापालिकेतर्फे १ ऑक्टोबर ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये जलवाहिनी, मलवाहिनी, गॅसवाहिनी, विद्युतवाहिनी, मोबाईल व इंटरनेट नेटवर्कसाठी केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाईसाठी परवानगी दिली जाते. यासाठी खासगी कंपनीकडून १२ हजार १९२ रुपये प्रतिमीटर तर महावितरणच्या विद्युतवाहिनीसाठी २ हजार ३५० रुपये प्रतिमीटर शुल्क घेतले आहे. महापालिकेला या शुल्कातून दरवर्षी किमान २५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यातून जे रस्ते खोदलेले आहेत, तेथे दुरुस्ती केली जाते.
एक मेपासून शहरात रस्तेखोदाई बंद झाली आहे. पाणीपुरवठा व सांडपाणी वाहिनी यासह इतर अत्यावश्यक कामांसाठी खोदाईची परवानगी दिली जाते. असे असताना शहरात बांधकाम व्यावसायिक, खासगी ठेकेदार, मोबाईल कंपन्या रस्ते खोदत असल्याचे समोर आले आहे. अशांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.
औंध डी-मार्ट येथे एका बांधकाम व्यावसायिकाने रस्तेखोदाई केल्याप्रकरणी ४१ लाख ६९ हजाराचा दंड केला आहे. तर वडगाव शेरी येथील खोदाईप्रकरणी एका खासगी ठेकेदाराला ५१ लाखाचा दंड केला आहे, अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.
फक्त तक्रार दंड नाही
सॅलिसबरी पार्क येथे एका मोबाईल कंपनीकडून केबल टाकली जात होती, या प्रकरणी कंपनीला दंड करणे अपेक्षित होते. पण दंड न करता केवळ स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दंड का केला नाही याबाबत अधिकाऱ्यांनी उत्तर देणे टाळले.