.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : अरणेश्वर येथील ट्रेझर पार्क ते मित्रमंडळ चौक या दरम्यानचा रस्ता पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला (Contractor) वारंवार मुदतवाढ दिली, काम गतीने करावे यासाठी नोटीस बजावली, तरीही रस्त्याचे काम अर्धवट असल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया महापालिका (PMC) प्रशासनाने सुरू केली आहे.
शहरातील रस्ते चांगले करण्यासाठी महापालिकेने सहा पॅकेजमध्ये ३०० कोटी रुपयांच्या टेंडर काढल्या होत्या. यातून १०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. पॅकेज एकमध्ये सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ६५ कोटी रुपयांची निविदा आहे, त्यात आठ रस्त्यांचा समावेश होता. त्यापैकी सातारा रस्त्याला समांतर असणारा ट्रेझर पार्क ते मित्रमंडळ चौक हा सुमारे १९०० मिटर लांबीचा रस्ता आहे. या कामासाठी २० कोटीचा खर्च येणार आहे.
महापालिकेने या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायमचा संपवावा, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, जलवाहिनी रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी म्हणून हे काम फेब्रुवारी २०२४मध्ये सुरू केले.
ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण करावे यासाठी पथ विभागाने त्याला नोटिसा बजावल्या आहेत. तरीही त्याच्याकडून कामाची गती वाढलेली नाही. अर्धवट कामामुळे खड्डे, माती, धुळीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असल्या तरी कामात प्रगती झालेली नाही. ठेकेदाराला महापालिकेने १ लाखाचा दंड देखील केला आहे.
ट्रेझर पार्क ते मित्रमंडळ चौक या रस्त्याचे काम रखडल्याने ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. दंडात्मक कारवाई देखील केली आहे. तरीही काम केले जात नाही, त्यामुळे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव तयार करणार आहोत. उर्वरित काम अन्य ठेकेदाराकडून पूर्ण करून घेतले जाईल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग