
पिंपरी (Pimpri) : अंतर्गत रस्ते, महामार्ग, मेट्रो मार्ग यासारख्या विकासकामांसाठी अनेकदा झाडे कापली जातात. काही वेळा या झाडांचे पुनर्रोपण केले जाते. मात्र, त्यांची योग्य निगा न घेतल्याने उन्हाळ्यात ही झाडे मृत पावतात. मात्र, हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी काढण्यात आलेली झाडे जगविण्यासाठी हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या ‘आयटीयन्स’नी पुढाकार घेतला आहे. या आयटी कर्मचाऱ्यांनी ‘गो ग्रीन’ या संस्थेच्या माध्यमातून घेतलेल्या पुढाकाराने शेकडो झाडांना स्थलांतर झाल्यानंतरही जीवनदान मिळाले आहे.
प्रशासनाकडून पाठपुरावा
पुण्यातील सर्वात लांब पल्ल्याची मेट्रो मार्गिका असणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या कामाला २०२१ मध्ये सुरुवात झाली. हिंजवडी - माण येथून सुरू झालेल्या या मेट्रो मार्गिकेसाठी राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या फेज १, फेज २ व फेज ३ मधील शेकडो झाडे कापावी लागणार होती. मात्र, ‘गो ग्रीन’ संस्थेसाठी काम करणाऱ्या आयटीयन्सनी पीएमआरडीए व एमआयडीसी यांच्याकडे पाठपुरावा करून या झाडांचे पुनर्रोपण केले.
हिंजवडी फेज -२ मधील एम्बसी आयटी पार्क शेजारील टेकडीवर या झाडांचे पुर्नरोपण करण्यात आले. ते करताना शास्त्रशुध्द पद्धत कोणती, त्यांची छाटणी कशी करावी, पुनर्रोपण केल्यावर काय काळजी घ्यावी, याचा अभ्यास करून या आयटी कर्मचाऱ्यांनी या झाडांचे पुनर्रोपण केले. याचा परिणाम म्हणून आज चार वर्षांनंतरही या झाडांचे अस्तित्व टिकून आहे.
सातशेपेक्षा अधिक झाडांचे पुनर्रोपण
मेट्रोच्या विविध टप्प्यांमध्ये ७०० पेक्षा अधिक झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. त्यातील सर्वाधिक पुनर्रोपण हे एम्बसी आयटी पार्क शेजारील टेकडीवर करण्यात आले आहे. या झाडांची वेळोवेळी राखण्यात येणारी निगा, प्रशासनाकडे पाठपुरावा, झाडांना देण्यात येणारे पाणी, झाडांवर करण्यात आलेले जिओ टॅगिंग यामुळे पुनर्रोपित केलेल्या झाडांचे जगण्याचे प्रमाण जास्त आहे.
जुन्या वटवृक्षापासून ५०० रोपे
मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करण्यासाठी अडथळा ठरणारे येथील १०० वर्षे जुने वडाचे झाड कापावे लागले. मात्र हे झाड काढण्यापूर्वीच गो ग्रीन संस्थेच्या सदस्यांनी या झाडाच्या फांद्यांपासून ५०० पेक्षा अधिक रोपे तयार केली. ही रोपे याच परिसरात लावण्यात आली असून, आता त्यांची उत्तम वाढ झाल्याचे येथील आयटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मेट्रोचे काम सुरू झाले, तेव्हा या कामास अडथळा ठरणारी झाडे काढण्यात येणार होती. मात्र, या झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी कोणतीही योजना पीएमआरडीए किंवा एमआयडीसीकडे नव्हती. त्यावेळी आम्ही प्रशासनाकडे या झाडांचे पुनर्रोपण करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनानेही या झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागा ठरवली. तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही या झाडांची देखरेख करत आहोत.
- राहुल मोहोड, आयटी कर्मचारी
कोणत्याही वृक्षाचे पुनर्रोपण करण्यासाठी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. त्यांची मुळे किती ठेवली पाहिजेत, त्यांची छाटणी किती करावी, पुनर्रोपणासाठी जमीन कशी असावी, याही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा याची काळजी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे चांगली झाडे मृत पावतात. मात्र गो ग्रीन संस्थेच्या माध्यमातून आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत.
- नरेश सोनावणे, आयटी कर्मचारी
सध्या हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. मेट्रोचेही काम सुरू आहे. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे थोपवायचे असेल तर झाडे जगवणे आवश्यक आहे. सध्या आम्ही पुनर्रोपित केलेल्या झाडांमुळे येथील जलस्त्रोतांमध्ये वाढ झाली आहे.
- विजय पाटील, आयटी कर्मचारी व रहिवासी, हिंजवडी