
पुणे (Pune) : महापालिकेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा जास्त ताण पडत असल्यामुळे त्यांचे मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी महापालिकेकडून काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी एका कॉर्पोरेट सार्वजनिक खासगी भागीदारीच्या निधीतून (सीएसआर) खास ‘मेंटल हेल्थ ॲप’ खरेदी केले जाणार आहे. त्याद्वारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासह त्यांचे मनोबल उंचावण्यावर भर देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि विविध ठिकाणी असलेल्या विभागांत हजारो अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडून रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी यांसह विविध प्रकारचे प्रश्न सोडविले जातात.
नागरिकांना सेवा-सुविधा पुरविल्या जात असताना महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा रात्री उशिरापर्यंत काम करण्याचीही वेळ येते.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले असावे, त्यांना चांगल्या पद्धतीने काम करता यावे, यादृष्टीने महापालिका प्रशासनाकडून त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीसमोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले राखणे, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी ‘मेंटल हेल्थ ॲप’ खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
‘सीएसआर’ निधीतून खर्च
संबंधित ॲपचे दोन हजार परवाने महापालिका खरेदी करणार आहे. एका युनिटसाठी सहा हजार ३७२ रुपये इतका खर्च येणार असून, दोन हजार परवान्यांसाठी एक कोटी २७ लाख ४४ हजार रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रियाही राबविण्यात आली असून, टचकिन ई-सर्व्हिसेस कंपनीची टेंडर सर्वांत कमी दराची आली आहे. हा खर्च ‘सीएसआर’ निधीतून केला जाणार आहे.