Pune : मुळा-मुठा नदी शुद्धीकरणाचे काय झालं? दीड वर्षांत नक्की काय केलं?

Pune Riverfront Project (File)
Pune Riverfront Project (File) Tendernama

पुणे (Pune) : महापालिकेने मुळा-मुठा नदी शुद्धीकरण (जायका) प्रकल्पाचे दीड वर्षापूर्वी भूमिपूजन केले. प्रत्यक्षात काम सुरू झालेले असली तरीही या जायका प्रकल्पातील अडथळ्यांची शर्यत अद्याप संपलेली नाही.

सांडपाणी प्रकल्पासाठी (एसटीपी) जागा ताब्यात न मिळणे, सांडपाणी वाहिनीचे काम रखडणे, मशिन तपासणीचा दौरा रद्द होणे अशा अडचणींमुळे प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. आत्तापर्यंत केवळ २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या प्रकल्पाचे काम चार महिने मागे आहे. तरीही २०२४ या वर्षात प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

Pune Riverfront Project (File)
पोलिसांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय दिली गुड न्यूज?

३९६ एमएलडी पाण्यावर होणार प्रक्रिया

शहराची लोकसंख्या ६० लाखांच्या पुढे गेली आहे. रोज १६५० एमएलडी (लाखो लिटर प्रतिदिन) पाण्याचा वापर केला जात असून, त्यातून १ हजार एमएलडी सांडपाणी तयार होत आहे. प्रशासनाच्या दाव्यानुसार सध्या ७४५ एमएलडी सांडपाणी रोज निर्माण होते. सध्या ९ सांडपाणी प्रकल्पांच्या माध्यमातून ४७७ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. जायका प्रकल्पांतर्गत १४७२ कोटी रुपये खर्च करून ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

शुद्धीकरण केंद्र, वाहिन्यांच्या कामांचा समावेश

केंद्र सरकारने या प्रकल्पाला २०१५ मध्येच मान्यता दिली होती; पण टेंडर प्रक्रियेतील गोंधळामुळे या प्रकल्पाचे भूमिपूजन होण्यास मार्च २०२२ उजाडण्याची वाट पाहावी लागली. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सीकडून (जायका) ९९० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या प्रकल्पात ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे, ५३.५ किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्या विकसित करणे, जीआयएस, एआयएस, स्काडा यंत्रणा उभारणे, कम्युनिटी टॉयलेट ब्लॉक उभारणे, अशा १३ प्रकारच्या कामांचा समावेश आहे.

Pune Riverfront Project (File)
'आदित्य' राजाच्या कृपेने 'वरुण' राजाच्या टेंडरचा पाऊस; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

राज्य सरकारचे असहकार्य

जायका प्रकल्पांतर्गत ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे (एसटीपी) उभारली जाणार आहेत. त्यापैकी ६ एसटीपीच्या जागा महापालिकेच्या ताब्यात होत्या. गेल्या दीड वर्षात आणखी चार जागा ताब्यात आल्या. औंध येथील कृषी विभागाच्या बोटॅनिकल गार्डनच्या जागेवर जैवविविधता उद्यानाचे आरक्षण आहे. तेथे १० एमएलडी एसटीपी बांधला जाणार आहे. त्या बांधकामाचे नकाशे, आराखडे अंतिम झाले आहेत. मात्र राज्य सरकारकडूनच महापालिकेला सहकार्य मिळत नसल्याने ही जागा ताब्यात मिळालेली नाही. या ठिकाणचे काम सुरू केले असते तर एकूण प्रकल्पाच्या कामाची टक्केवारी ३५ टक्क्यांपर्यंत गेली असती.

दोन किमीच्या वाहिनीचे काम पूर्ण

एसटीपीला सांडपाण्याचा पुरवठा करण्यासाठी १९ ठिकाणी ५३.५ किलोमीटर लांबीची सांडपाणी वाहिनी टाकली जाणार आहे. हे काम करताना अपेक्षित गती मिळालेली नसल्याने आत्तापर्यंत फक्त १० ठिकाणी काम सुरू झाले असून, केवळ २ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सांडपाणी वाहिनी टाकताना इतर जलवाहिनी व सांडपाणी वाहिनी स्थलांतरित करणे, नदी काठ सुधार प्रकल्पासोबत समन्वय साधणे, त्यांची मान्यता मिळाल्यानंतर नदीच्या परिसरात काम केले जाणार आहे.

न्युमोनियाच्या उद्रेकामुळे चीनचा दौरा रद्द

जायका प्रकल्पातील एकूण कामाच्या ४० टक्के वाटा हा बांधकामाचा आहे, तर उर्वरित ६० टक्के काम हे विद्युत व यंत्रसामग्रीशी निगडित आहे. बांधकामाचे काम २५ ते ३० टक्के पूर्ण झाले आहे, त्यामुळे या प्रकल्पासाठी परदेशातून यंत्रसामग्री आणली जाणार आहे. त्याच्या तपासणीसाठी महापालिकेचे अधिकारी चीनला जाणार होते. पण चीनमध्ये न्युमोनियाचा उद्रेक झाल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दौरा रद्द झाला आहे. त्याऐवजी आता त्रयस्थ संस्थेद्वारे यंत्रसामग्रीचे परीक्षण केले जाणार आहे. सुमारे ८० कोटी रुपयांची यंत्रसामग्री चीनमधून येणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कोरिया, इटली, अमेरिकेतून यंत्रसामग्री आणली जाणार आहे.

Pune Riverfront Project (File)
Bacchu Kadu : दादा भुसे अन् झेडपीचा बच्चू कडूंनी रात्री पावणेबारालाच केला 'करेक्ट कार्यक्रम'!

जायका प्रकल्पातील एसटीपीची क्षमता (एमएलडी)

- नायडू - १२७

- भैरोबा - ७५

- धानोरी - ३३

- खराडी - ३०

- वारजे - २८

- वडगाव - २६

- मुंढवा - २०

- मत्स्यबीज केंद्र - ७

- तानाजीवाडी - १५

- बाणेर-२५

- बोटॅनिकल गार्डन - १०

असा आहे प्रकल्प

प्रकल्प उभारणीचा खर्च - ११७३ कोटी

देखभाल दुरुस्तीचा खर्च - ३०० कोटी

एकूण खर्च - १४७३ कोटी

आत्तापर्यंत झालेला खर्च - २६५.१० कोटी

काम पूर्ण करण्याची मुदत - मार्च २०२५

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com