

मुंबई (Mumbai): पुरंदर तालुक्याचा रस्ते विकास वेगाने पुढे नेत 191 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीस शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच 76 किमी सायकल ट्रॅकचे रुंदीकरण आणि एकूण 119 कोटी रुपयांची विस्तृत कामे पुरंदरमध्ये सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
मंत्री भोसले म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील 383 कि.मी. पंचायत समितीचे रस्ते व 268 कि.मी. एमडीआर रस्ते पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने 191 कि.मी. रस्त्यांच्या दुरुस्तीस मंजुरी दिली आहे.
भोसले म्हणाले की, पुरंदरमध्ये एअरपोर्ट, लॉजिस्टिक पार्क आणि मोठी गुंतवणूक येत असल्याने तालुक्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. गुणवत्ता हा आमचा मुख्य निकष असून कुठेही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. रस्त्यांवरील डीएलपीअंतर्गत उर्वरित कामे संबंधित ठेकेदारांकडून पूर्ण करून घेतली जात आहेत.
अधिकारी किंवा कंत्राटदारांकडून कुठेही अनियमितता झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, मांढरदेव यात्रेपूर्वी राजगड तालुक्यातील सर्व रस्ते पूर्णपणे दुरुस्त केले जातील असेही मंत्री भोसले यांनी सांगितले. आमदार विजय शिवतारे यांनी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.