
कात्रज (Katraj) : विविध कारणांनी सदैव चर्चेत असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावरील (Katraj Kondhva Road News) अतिक्रमणांना महापालिकेने (PMC) दणका दिला आहे.
कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमण कारवाई झाली. नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारी व त्यांना होणारा त्रास व वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी या कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार उपायुक्त परिमंडळ क्रमांक ४ अंतर्गत क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील राजस सोसायटी चौक ते खडीमशीन चौक येथील रस्ता पदपथावरील तसेच फ्रंट व साइड मार्जिनमधील अतिक्रमणांवर बांधकाम विकास विभाग व अतिक्रमण विभागाकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.
अतिक्रमण उपायुक्त संदीप खलाटे, परिमंडळ चारचे उपायुक्त जयंत भोसेकर, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या नियंत्रणाखाली उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, १० सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, तीन महापालिका पोलिस कर्मचारी व १० महाराष्ट्र सुरक्षा बलच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यामध्ये सात हजार ५०० चौरस फूट क्षेत्र व १६ कच्चे-पक्के शेड रिकामे करण्यात आले. तसेच सात ट्रक साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक मेघा राऊत यांनी दिली.
अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमणे केल्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर कोणाही अतिक्रमण करू नये.
- लक्ष्मण कादबाने, सहायक आयुक्त, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय