.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर (Solapur) : नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देताना महापालिकेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी तीन वर्षांपूर्वी परिवर्तन ॲप सुरू करण्यात आले. मात्र या ॲपने परिवर्तन झालेच नाही, परिस्थिती जैसे थेच आहे. आता नागरिकांना तक्रारीसाठी महापालिकेच्या संगणक विभागाने नव्याने माय सोलापूर ॲप व संकेतस्थळ विकसित केले आहे. (My Solapur App News)
सोलापूरकरांना तक्रारीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच महापालिकेतील कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तीन वर्षांपूर्वी त्रयस्थ संस्थेने विकसित केलेले परिवर्तन ॲप महापालिकेने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले.
या ॲपवर मागील तीन वर्षात सात हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील सर्वच तक्रारींचे निरसन झाल्याचा ॲपवर ग्रीन शेरा दिसतो आहे. परंतु प्रत्यक्षात तक्रारीचे निरसन झाले नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. या तक्रारींचे निरसन करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित होत नसल्याचेही दिसून आले. तसेच हे ॲप गुगलवरून (Google App Store) काढून टाकल्याने त्यामधील तांत्रिक त्रुटी दूर करणे शक्य नव्हते.
नवीन बदल करण्यासाठी महापालिकेला पैसे मोजावे लागणार होते. त्यामुळे जुने ॲप बंद करून महापालिकेच्या संगणक विभागाने स्वत:चे माय सोलापूर ॲप विकसित केला आहे. परिवर्तन ॲपमधील अडचणी लक्षात घेत अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित होईल, अशा पद्धतीने हे ॲप व वेबसाइट विकसित केली गेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निरसन होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
संकेतस्थळ, ॲप अन् टोल फ्री नंबर
नागरिकांना देण्यात येणाऱ्या रस्ता, पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाइट, स्वच्छता, होर्डिंग आदी संदर्भातील तक्रारी नोंदविण्यासाठी ऑनलाइन स्वरूपात प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेच्यावतीने माय सोलापूर ॲप आणि https://complaint.solapurcorporation.org हे संकेतस्थळावर विकसित केले आहे. तसेच महापालिकेच्या १८००२३३१९१६ या टोल फ्री नंबरवर देखील तक्रारी नोंदविता येणार आहे.
नागरिकांनी दिलेली तक्रार वेळेत सोडविली असल्यास तक्रारीला रेटिंग देता येणार आहे. तक्रार निराकरणाने समाधान झाले नसल्यास वरिष्ठांकडे तक्रार पाठविता येणार आहे. तसेच नागरिकांना मोबाईल अॅप व वेबसाईटच्या माध्यमातून तक्रारी करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्याचीही माहिती महापालिकेला देण्यात येणार आहे.