
पुणे (Pune) : ‘ई-बाइक टॅक्सी’चा (E Bike Taxi) प्रवास हा १५ किलोमीटरच्या परिघातच असणार आहे. ही सेवा केवळ अॅपधारकांसाठीच उपलब्ध असणार असून, रस्त्यावर हात दाखविणाऱ्या वा सेवेची मागणी करणाऱ्यांना तिचा लाभ घेता येणार नाही. शिवाय ई-बाइक टॅक्सीचा वेग ताशी ६० किलोमीटर इतका असणार आहे.
महिला प्रवासी सुरक्षेसाठी महिला चालक निवडण्याची मुभा असणार आहे. ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदाच स्पष्ट नियमावली जाहीर केली आहे. यात ऑपरेटरसह चालकांना विविध नियम लागू केले आहेत. तसेच प्रवासी सुरक्षेसंदर्भातदेखील विविध उपायांचा अंतर्भाव केला आहे.
राज्य सरकारने ‘ई-बाइक टॅक्सी सेवा’ अधिकृतपणे सुरू करण्यासाठी ‘महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियमावली- २०२५’चा मसुदा नुकताच जाहीर केला. यात ही सेवा पर्यावरणपूरक व सुरक्षित वाहतूक पर्याय उपलब्ध करून देणे, तसेच बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. या मसुद्यावर ५ जून २०२५ पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत.
हे आहेत नियम
ऑपरेटर
- कमीत कमी ५० इलेक्ट्रिक दुचाकी हव्यात.
- परवाना मिळवण्यासाठी ५ लाख सुरक्षा ठेव आणि १ लाख अर्ज शुल्क आकारले जाईल.
- परवाना ५ वर्षांसाठी वैध असेल.
वाहन व चालकांसंबंधी नियम
- वाहनाचा रंग पिवळा असावा आणि ‘बाईक टॅक्सी’ असे लिहिलेले असावे.
- वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग अनिवार्य.
- चालकाचे वय २० ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे आणि पोलिस तपासणी अनिवार्य.
- सुरक्षित रस्ते प्रवासासाठी व प्रवाशाशी सौजन्याने वागावे.
- दररोज ८ तासांपर्यंत काम करण्यास मुभा
प्रवासी सुरक्षेसाठी
- प्रवाशांसाठी हेल्मेट अनिवार्य.
- वाहनात चालक आणि प्रवासी यांच्यात विभाजक असावा.
- महिला प्रवाशांसाठी महिला चालक निवडण्याची मुभा.
सेवा मर्यादा
- सेवा फक्त अॅपद्वारे बुकिंगसाठी उपलब्ध; रस्त्यावरून थांबवून सेवा घेता येणार नाही.
- वाहनाची कमाल वेगमर्यादा ६० किमी प्रतितास.
- अतिवृष्टी किंवा वादळी हवामानात सेवा स्थगित केली जाईल.
- प्रवाशांनी धूम्रपान, मद्यपान किंवा वाहनास नुकसान पोहोचवू नये.