
पुणे (Pune) : नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा वाहन चालकांना सर्वाधिक फटका बसतो, हे चित्र बदलण्यासाठी अनेक उपाययोजना प्रस्तावित आहेत. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शास्त्रीनगर चौकातील उड्डाण पूल व भुयारी मार्गाच्या कामामुळे एक पाऊल पुढे पडणार आहे. त्यादृष्टीने भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला जानेवारीत सुरवात होत आहे. संबंधित काम दोन ते तीन वर्षात पूर्ण झाल्यानंतर किमान येरवडा, शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शास्त्रीनगर चौकातील उड्डाणपूल व समतल विलगकाच्या (ग्रेड सेप्रेटर) प्रत्यक्ष कामाला नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुहूर्त लागणार आहे. वाहतूक पोलिसांची परवानगी प्राप्त होताच संबंधित कामास जानेवारी महिन्यात सुरवात होणार आहे, तत्पर्वी महापालिका प्रशासनाकडून संबंधित कामासाठीची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.
शास्त्रीनगर चौकामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने विकास आराखड्याअंतर्गत चौकामध्ये उड्डाणपूल व समतल विलगक निर्मितीचे नियोजन केले होते. संबंधित उड्डाणपूल व समतल विलगक होत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच असलेल्या आगाखान पॅलेसमुळे या कामास अडचण येत होती. महापालिका प्रशासनाने मागील वर्षभर यासंबंधी केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यास संबंधित विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाले.
दरम्यान, महापालिकेने संबंधित उड्डाणपूल, समतल विलगकाच्या कामासाठी केलेला आराखडा जुना झाल्याने महापालिकेने नवीन आराखडा तयार केला. रस्त्यावरील वाढलेली वाहतूक व अन्य कारणांमुळे नवीन आराखडा तयार करून त्यानुसार आखणी, वाहतूक सर्वेक्षण, माती परिक्षण या स्वरूपाची कामे करण्यास सुरवात केली. स्थायी समितीसमोर जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग (जेईडी) सादर केल्यानंतर पुढील कामाला गती मिळाली.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी संबंधित कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सध्या माती परिक्षणाचे काम सुरू आहे. रस्त्याची आखणी, वाहतूक पोलिसांकडे कामासाठी परवानगीसाठी पाठपुरावा या पद्धतीने संबंधित कामाची पूर्वतयारी सुरू आहे.
पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर पुढील महिन्यापासून समतल विलगकाच्या खोदाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. संबंधित रस्ता ६० मीटरचा आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी प्रारंभी समतल विलगक व त्यानंतर उड्डाणपुलाचे काम केले जाणार आहे.
टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध
उड्डाणपूल व समतल विलगकाच्या कामासाठी ९८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. २०२४ - २५ यावर्षीच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, तर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका अधिनियम कलम ७२ (ब) प्रमाणे ९८ कोटी रुपये संबंधित कामास मिळण्यासाठी त्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारा निधी आता दरवर्षी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
असे आहे नियोजन
- उड्डाण पुलाची लांबी - ३९६ मीटर
- पोहोच रस्त्यासह पुलाची लांबी - ७३४ मीटर
- रुंदी- साडे आठ मीटर
- समतल विलगक लांबी - १४५ मीटर
- पोहोच रस्त्यासह समतल विलगक लांबी - ५७२ मीटर
- प्रकल्पासाठी येणारा खर्च - १०० कोटी
- २०२४-२५ वर्षात कामासाठी केलेली तरतूद - १० कोटी रुपये
शास्त्रीनगर चौकातील पुलाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यापासून सुरवात होणार आहे. सध्या माती परीक्षणाचे काम सुरू आहे. वाहतूक पोलिसांच्या परवानगीनंतर संबंधित खोदाईच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होईल.
- अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, महापालिका