
पुणे (Pune) : विश्रांतवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी (Traffic) टाळण्यासाठी महापालिकेकडून या चौकात उड्डाण पूल व समतल विगलक (ग्रेडसेप्रेटर) उभारण्यात येणार आहे. यामुळे लोहगाव, आळंदी व शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली माहिती. या प्रकल्पासाठी महापालिकेने ६२ कोटी रुपयांची तरतूद केली असून, डिसेंबरमध्ये काम सुरू होण्याची शक्यता आहे.
विश्रांतवाडीतील आंबेडकर चौकात आळंदी व लोहगावला ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अभ्यास करण्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये सल्लागाराची नेमणूक केली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, आंबेडकर चौकात उड्डाण पूल व ग्रेड सेप्रेटर उभारण्याचे सुचविण्यात आले. उड्डाण पूल व ग्रेड सेप्रेटरच्या पर्यायामुळे सुरक्षित वाहतूक होण्याबरोबरच इतर रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्यादेखील सुटण्याची शक्यता त्यांच्या अहवालात नमूद करण्यात आली होती.
असा असेल प्रकल्प
- उड्डाण पुलाची लांबी ६३० मीटर
- आळंदी, लोहगाव व येरवडा येथे जाणाऱ्या वाहनांसाठी उपयुक्त
- उड्डाण पुलाची रचना Y आकाराची
- ग्रेड सेप्रेटरची लांबी ५९५ मीटर
- टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरमध्ये काम सुरू होण्याची शक्यता
- चौकातील पादचारी पूल उतरवून त्याचा इतर ठिकाणी वापर करणार
विश्रांतवाडीतील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी विश्रांतवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात उड्डाण पूल व ग्रेड सेप्रेटर करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसवावा
या चौकात उड्डाण पूल व ग्रेड सेप्रेटर करताना तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. त्याबाबत काही वर्षांपूर्वी सर्वसाधारण सभेत ठरावदेखील झालेला आहे. त्यामुळे महापालिकेने नियोजन करताना हा पुतळा बसविण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली.