
पुणे (Pune) : पुणे- पानशेत रस्त्यावरील (Pune - Panshet Road) खानापूर गावच्या हद्दीतील पाबे फाट्याजवळील पुलाचे (Bridge) काम अर्धवट सोडून ठेकेदार (Contractor) गायब झाला आहे.
अर्धवट कामामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका असून स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पर्यटक व पानशेत परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना या पुलावरून ये-जा करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून अर्धवट असलेले पुलाचे काम पूर्ण करून घेण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
खानापूर येथील अर्धवट काम झालेल्या पुलावरील अर्ध्या भागावर राडारोड्याचा ढीग तसाच पडून आहे. त्याचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून रात्रीच्या वेळी या ढिगाऱ्यावर वाहन आदळून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच पुलाच्या संरक्षक कठड्याचे कामही अपूर्ण असून लोखंडी सळया बाहेर आलेल्या आहेत.
जवळच महात्मा गांधी विद्यालय असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी या पुलावरून ये-जा करतात. तसेच स्थानिकांसह पर्यटकांचीही या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याच्या अगोदर या पुलाचे काम तातडीने पूर्ण करून घेण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
सातत्याने लहान-मोठे अपघात होत असल्याने रखडलेले काम तातडीने पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.
- विद्याधर थोपटे, उपसरपंच, मणेरवाडी
महात्मा गांधी विद्यालयातील शेकडो विद्यार्थी दररोज या पुलावरून ये-जा करतात. त्यामुळे तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. पुलावर राडारोडा पडलेला असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता आहे. अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम पूर्ण करून घेण्यास सांगितले. परंतु, अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
- शरद जावळकर, माजी सरपंच, खानापूर
खानापूर येथील पुलाचे अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यासाठी नव्याने टेंडर काढण्याचे काम सुरू आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने काम करून घेण्यात येईल. या रस्त्यावरील अर्धवट किंवा राहिलेली सर्व कामे करून घेण्यात येणार आहेत.
- ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग