

पुणे (Pune) : झपाट्याने वाढलेले आयटी क्षेत्र, ऑटोमोबाइल क्षेत्रातील वाढ, स्टार्टअपची वाढती संख्या, पायाभूत सुविधांसह विविध कारणांमुळे पुण्यात नोकरी करत स्थायिक होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील सहा बड्या शहरांच्या तुलनेत पुण्यात वर्षभरात सर्वाधिक घरांची विक्री झाली.
पुण्यात २०२३ मध्ये ८९ हजार ३४७ सदनिकांची विक्री झाली आहे. या घरांची किंमत ५७ हजार ४१२ कोटी रुपये आहे. त्यानंतर दिल्ली आणि परिसराचा नंबर लागतो. तेथे ६५ हजार ६२५ घरे विकली गेली आहेत. पुण्यात २०२२ ला ८० हजार ६४ घरांच्या व्यवहारांची नोंद झाली. त्यातून ४८ हजार ३०५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट’मधून ही माहिती देण्यात आली आहे.
सर्वाधिक मुद्रांक शुल्क संकलन
२०२३ मध्ये गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक मुद्रांक शुल्क संकलित झाले आहे. हा आकडा तीन हजार ७७९ कोटींवर पोहचला आहे. २०२२ मध्ये तो दोन हजार ९९५ इतका होता. २०१९ च्या तुलनेत यंदा मुद्रांक शुल्क संकलन १०२ टक्क्यांनी वाढले आहे.
४५ ते ७० लाखांच्या घरांची विक्री
७० लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांची सर्वाधिक विक्री होण्याचा ट्रेंड कायम आहे. ४५ ते ७० लाख किंमत असलेल्या घरांची सर्वाधिक खरेदी झाली आहे. त्यानंतर ७० लाख ते एक कोटी रुपयांचे घर ग्राहकांकडून खरेदी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महागडी घरे घेणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीदेखील चांगली राहिली आहे.
सर्वाधिक विक्री होण्याची कारणे
पुणे विभागाचा विकास
सातत्याने वाढलेले प्रकल्प
पुणे मेट्रो प्रकल्प
रिंगरोडचे नियोजन
शिक्षणाच्या चांगल्या संधी
वाहन उद्योगातील वाढ
माहिती- तंत्रज्ञान क्षेत्राचा झालेला विकास
भक्कम पायाभूत सोयीसुविधा
सोशल इन्फ्रास्ट्रक्चर
नोकरीच्या अनेक संधी
पूरक हवामान
आयजीआर डेटा, महारेरा आणि सीआरई मॅट्रिक्ससह आमच्या टीमने वास्तविक प्रकल्पाच्या ठिकाणांहून एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे. बाजारपेठेतील वाढती मागणी लक्षात घेत त्यांच्या प्रकल्पांमध्ये या माहितीचा समावेश करणे शक्य होईल. या अहवालाद्वारे विक्रीसोबतच पुणे विभाग हा आपली बाजारपेठ आणखी मजबूत करीत आहे, ही आम्हा सर्वांसाठी सकारात्मक बाब आहे.
- रणजित नाईकनवरे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो