
पुणे (Pune) : पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंना भेटी देऊन त्याबाबतचा इतिहास जाणून घेण्यात येणाऱ्या ‘हेरिटेज वॉक’च्या दुसऱ्या टप्प्यातील ‘सिग्नेचर वॉक’ ही गडकिल्ल्यांना भेटी देण्याची महत्त्वाकांक्षी संकल्पना पुणे महापालिकेने (PMC) पुढे आणली होती.
पुणेकरांसह देशातील व परदेशातील पर्यटकांना आपल्या गडकिल्ल्यांची, इतिहासाची माहिती करून देणारा हा उपक्रम दीड वर्षानंतरही कागदावरच राहिला आहे. केवळ बस सुविधा मिळत नसल्याच्या तांत्रिक कारण यासाठी पुढे करण्यात आले आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ‘हेरिटेज वॉक’चा दुसरा टप्पा म्हणून ‘सिग्नेचर वॉक’ची संकल्पना पुढे आणली. या उपक्रमाअंतर्गत सिंहगड किल्ला, आंबेगाव येथील शिवसृष्टी व इस्कॉन मंदिर यांना भेटी देण्यात येणार होत्या.
ढाकणे यांच्या उपस्थितीतच २२ सप्टेंबर २०२३ रोजी ‘सिग्नेचर वॉक’ची सिंहगड किल्ला, शिवसृष्टी या ठिकाणी चाचणीदेखील घेण्यात आली. त्यानंतर काही दिवसांतच हा उपक्रम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सिंहगडावरील पर्यटनवाढीच्या दृष्टीने हा उपक्रम फायदेशीर ठरणारा होता; पण हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
तयारी केली; पण...
- ‘सिग्नेचर वॉक’ सुरू करण्यासाठी स्वारगेट ते सिंहगड दरम्यान वातानुकूलित मिनी बस उपलब्ध करून देण्याबाबत ‘पीएमपी’कडे पत्रव्यवहार
- वनविभाग व पर्यटन विभागाशी चर्चा करून गडावर पर्यटनाच्यादृष्टीने आवश्यक सुविधाही दिल्या जाणार होत्या
- विशेषतः परदेशी पर्यटकांना हॉटेलमधूनच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी बस सुविधा दिली जाणार होती
- त्यासाठी आवश्यक संकेतस्थळाची निर्मिती
- मात्र विकास ढाकणे यांच्या बदलीनंतर हेरिटेज सेलकडून उपक्रमाकडे काणाडोळा
- अरुंद रस्त्यामुळे सिंहगडावर जाणाऱ्या ‘पीएमपी’च्या बस बंद पडण्याच्या घटना
- त्यामुळे ‘सिग्नेचर वॉक’साठी महापालिकेला बस मिळू शकल्या नाहीत
- महापालिकेने अखेर ‘सिग्नेचर वॉक’ उपक्रम सुरू करण्यात अपयश
‘सिग्नेचर वॉक’ या उपक्रमाद्वारे सिंहगड किल्ला, शिवसृष्टीची पर्यटकांना ओळख करून देण्यात येणार होती. त्यासाठी प्रारंभी महापालिकेने बससुविधा मिळावी यासाठी ‘पीएमपी’कडे पाठपुरावा केला होता. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे बससुविधा मिळू शकली नाही. त्यामुळे हा उपक्रम सुरू झाला नाही. मात्र, ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांकडे पुन्हा एकदा याबाबत चर्चा केली जाईल.
- सुनील मोहिते, उपअभियंता, हेरिटेज सेल व भवन विभाग, पुणे महापालिका
सिंहगड किल्ला, शिवसृष्टी किंवा शहरातील अन्य ऐतिहासिक वास्तूंना भेटी देण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’प्रमाणे सुविधा पाहिजे होती. अशी सुविधा नसल्यामुळे पर्यटकांना तेथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामध्ये बदल घडल्यास पुण्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास परराज्यातील पर्यटकांमध्ये पोचण्यास मदत होईल.
- अभय पुरी, पर्यटक