
पुणे (Pune) : मलनिःसारण विभागातील कारभाराच्या तक्रारी, जलपर्णीच्या कामाची माहिती न देणे, नोटीसला उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यामुळे मलनिःसारण विभागाचे प्रमुख संतोष तांदळे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांनी दोन दिवसात नोटिसला उत्तर न दिल्यास त्यांची विभागीय चौकशी सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्तांकडून दर सोमवारी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेऊन त्यामध्ये किती प्रगती आहे याची माहिती घेतली जाते. तेथे दुरुस्ती आवश्यक आहे, त्यासाठी सूचना केल्या जातात. आयुक्तांनी मलनिःसारण देखभाल दुरुस्ती विभागाची माहिती या बैठकांमध्ये मागितली होती, पण अधिक्षक अभियंता तांदळे यांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली.
शहरातील तलाव आणि नदीमध्ये जलपर्णी काढण्यासाठी एक कोटी रुपयांचे टेंडर काढलेले असतानाही जलपर्णी जैसे थे असल्याचे चित्र आहे, त्यामुळे यासंदर्भातही माहिती मागितली होती, पण ती देखील न दिल्याने तांदळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याची मुदत उलटून १५ दिवस होऊन गेले तरीही तांदळे यांनी अद्याप नोटीसला उत्तर दिले नाही.
मलनिःसारण विभागातील टेंडर, निधीचे वाटप यासंदर्भातही आयुक्तांकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी आयुक्तांना पत्र देऊन तांदळे यांची चौकशी करणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांना मलनिःसारण विभाग प्रमुख पदावरून बाजूला करणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते.
त्यास आयुक्तांनी मंजुरी दिल्याने आज तांदळे यांची जबाबदारी काढून कार्यकारी अभियंता श्रीधर येवलेकर यांच्याकडे देण्यात आली. दरम्यान, तांदळे यांची यासंदर्भात बाजू घेण्यासाठी वारंवार संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
मलनिःसारण विभागाच्या कामासंदर्भात संतोष तांदळे यांना नोटीस बजावली होती, पण त्यास त्यांनी उत्तर दिलेले नव्हते. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करणे आवश्यक असल्याने त्यांचा कार्यभार काढून घ्यावा असे पत्र आयुक्तांना दिले होते. त्यानुसार त्यांना जबाबदारीतून मुक्त केले आहे. त्यांनी पुढील दोन दिवसात नोटीसला उत्तर दिले नाही किंवा नोटीसचे उत्तर समाधानकारक नसले तर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका