पुणे (Pune) : पुणे शहरातील स्वच्छतागृहांची नियमीत स्वच्छता व्हावी यासाठी मशिनद्वारे स्वच्छता करण्याचा निर्णय घेऊन पाच परिमंडळांसाठी पाच टेंडर (Tender) काढण्यात आले. पण ठेकेदारांकडून (Contractors) व्यवस्थित काम केले जात नसल्याच्या तक्रारी आल्याने कामाचा आढावा घेण्यात आल्या. कामात सुधारणा करा अन्यथा टेंडर रद्द करू असा इशारा महापालिका (PMC) प्रशासनाने दिला आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याने नागरिकांची कुचंबणा होत असल्याने महापालिकेने गर्दीच्या ठिकाणांसह इतरत्र स्वच्छतागृह बांधण्याचे काम गेल्या काही वर्षांत हाती घेतले. पण महापालिका कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसल्याने स्वच्छता राखली जात नव्हती. त्यामुळे सार्वजनिक मुतारी, स्वच्छतागृह आणि वस्ती पातळीवरील स्वच्छतागृहांची स्वच्छता नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत होता. त्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने काही यांत्रिकीकरणाद्वारे स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
यामध्ये दिवसातून दोन वेळा स्वच्छता करणे ठेकेदारावर बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी आल्याने आज अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी ठेकेदार, परिमंडळाचे उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालय, वाहन विभाग, घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. स्वच्छतेसाठी महापालिकेच्या ३४ आणि ठेकेदारांच्या २४ जेटिंग मशिनचा वापर केला जात आहे.
बैठकीत काय झाले?
- ठेकेदारांनी आठ तासांत आम्हाला दिलेले काम पूर्ण होऊ शकत नाही यासह इतर तक्रारी केल्या.
- त्यावर दिलेले काम पूर्ण करणे ही ठेकेदाराची जबाबदारी असून, याचा विचार टेंडर भरण्यापूर्वी करणे आवश्यक होते असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
- महिन्यातून एकदा संपूर्ण स्वच्छता केली जात नाही, स्वच्छतेसाठी जेटिंग मशिनसोबत पाणी कमी असते, नोझल पाईपची लांबी कमी असते, त्यामुळे अर्धवट स्वच्छता होते या त्रुटी प्रशासनाने बैठकीत मांडून यात सुधारणा करा, पुन्हा तक्रारी येऊ देऊ नका. कामात सुधारणा करा अन्यथा निविदा रद्द केली जाईल असे बैठकीत सांगण्यात आले.
विभाग आणि स्वच्छतागृहातील सिटची संख्या
परिमंडळ एक (येरवडा-ढोले पाटील रस्ता- नगर रस्ता) - २३११
परिमंडळ दोन (कोथरूड,शिवाजीनगर औंध) - ३१९८
परिमंडळ तीन (वारजे, सिंहगड रस्ता, धनकवडी) - १६९४
परिमंडळ चार (वानवडी-हडपसर-कोंढवा) - १०७५
परिमंडळ पाच (बिबवेवाडी-भवानीपेठ- कसाब, विश्रामबाग) - १४६५
पाच परिमंडळातील एकूण स्वच्छता गृह - १२८८
स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी पाच परिमंडळनिहाय टेंडर काढली आहे. ठेकेदाराच्या कामाबद्दल तक्रारी असल्याने महापालिकेच्या १५ अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला होता. त्यामध्येही अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यासंदर्भात आज बैठक घेऊन कामात सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा टेंडर रद्द केली जाईल.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका