
पुणे (Pune) : पुणे महापालिका (PMC) आयुक्त नवलकिशोर राम (Navalkishor Ram) यांनी झाडणकामाच्या वादग्रस्त ठरलेल्या टेंडर रद्द करून पुन्हा तातडीने नव्याने टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आता या नवीन टेंडर जुन्या नियम अटीनुसार निघणार आहेत. त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
पुणे शहरात प्रमुख रस्ते हे स्वीपर मशिनद्वारे झाडले जातात. तर उर्वरित रस्ते व गल्लीबोळ, सार्वजनिक जागा, पादचारी मार्ग याचे झाडणकाम करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून दरवर्षी टेंडर काढली जाते. यामध्ये महापालिका मनुष्यबळ पुरविण्यासाठी ठेकेदारांना पैसे देते.
यंदाच्या वर्षी काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाडण कामाच्या टेंडरच्या नियम व अटींमध्ये मोठे बदल केले. सुधारणांच्या नावाखाली टेंडरमधील स्पर्धा कशी कमी होईल आणि ठराविक ठेकेदारांच्या हातात कोट्यवधी रुपयांच्या टेंडर जातील याची काळजी घेण्यात आली होती. यामध्ये चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कार्यपद्धतीबाबत वार्तांकन केले. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेला स्थगिती मिळाली, त्याची चौकशी सुरू झाली.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे सादर केला. या टेंडरमध्ये रिग झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ही टेंडर रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. ७) राम यांनी टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच नवीन टेंडर प्रक्रिया सुरू करा, असेही त्यात नमूद केले आहे.
कर्मचाऱ्यांवर नियंत्रण वाढणे आवश्यक
आयुक्तांनी झाडणकामाच्या नवीन टेंडर काढण्याचे आदेश दिले असून, जुन्या नियम व अटीनुसारच या टेंडर काढल्या जाणार आहेत. पण रोज किती कर्मचारी कामावर येतात, त्यांच्याकडून प्रत्यक्षात किती भागाचे झाडणकाम होते यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तर खोट्या हजेरी लावून फक्त पगार उचलणाऱ्यांवर व त्यांना अभय देणाऱ्या मुकादम, आरोग्य निरीक्षकांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
तरच झाडणकामात पारदर्शकता येऊन शहर स्वच्छ होणार आहे. त्यामुळे टेंडरमध्ये स्पर्धा होईल, काम चांगले होईल यासाठी काही प्रमाणात सुधारणाही होणे आवश्यक आहे.
महापालिका आयुक्तांनी सध्याची टेंडर प्रक्रिया रद्द केल्यानंतर आता जुन्या अटीशर्तीनुसार टेंडर प्रक्रिया राबविल्या जातील. काम चांगले व्हावे यासाठी आवश्यकता असेल तेथे सुधारणा केली जाईल.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका