
पिंपरी (Pimpri) : महापालिकेने हरित कर्ज रोख्यांद्वारे (ग्रीन बॉण्ड) २०० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. ‘बीएसई’च्या इलेक्ट्रॉनिक टेंडर प्रणालीवर खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हा निधी उभारला आहे.
कर्ज रोख्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी महापालिकेवर विश्वास दाखवला आहे. केवळ एका मिनिटात १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला असून, एकूण ५१३ कोटी रुपयांचे टेंडरप्राप्त झाले आहेत. म्हणजेच रोख्यांना ५.१३ पट अधिक मागणी मिळाली आहे. या हरित कर्ज रोख्यांना क्रिसिल आणि केअर या संस्थांकडून ‘एए+’ दर्जा मिळाला आहे. ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडने व्यवहार सल्लागार आणि मर्चंट बँकर म्हणून काम पाहिले. रोख्यांचा कालावधी पाच वर्षांचा असून त्यासाठी ७.८५ टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित केला आहे. परतफेडीची हमी सुनिश्चित करण्यासाठी मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे राष्ट्रीयकृत बँकेत एस्क्रो खाते तयार केले आहे. यामुळे महापालिकेला भारत सरकारकडून २० कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
प्रकल्पांसाठी निधी
हरित कर्ज रोख्यांतून उभारलेला निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळी माथा ते इंद्रायणी नगर चौक दरम्यानचा टेल्को रस्ता विकास प्रकल्प या दोन महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे.
‘‘महापालिकेने हरित कर्ज रोखे काढताच उदंड प्रतिसाद मिळाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत भविष्याबद्दल गुंतवणूकदारांचा महापालिकेवर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निधीमुळे शहरात महत्त्वाचे पर्यावरणपूरक प्रकल्प गतीने राबवणे शक्य होणार आहे. असा प्रकल्प राबविणारी राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका