.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पिंपरी (Pimpri) : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह भोसरी, चाकण, तळेगाव, मरकळ, शिक्रापूर औद्योगिक क्षेत्रांसाठी महत्त्वाचा असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर रहदारी वाढली आहे. रखडलेले रुंदीकरण आणि केवळ कागदावर असलेल्या ‘एलिव्हेटेड’ मार्गामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. (Pune Nashik Highway Traffic News)
महामार्गावरील प्रत्येक चौकापासून चारही दिशांना अनेकदा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातून मार्ग काढताना चालकांसह प्रवाशांची अधिक ‘कोंडी’ होते. स्थानिकांनाही त्रास होतो. त्यामुळे कोंडीमुक्त महामार्ग करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय कारभाऱ्यांना वेळ मिळेल का? नाशिक फाटा ते खेडपर्यंत रुंदीकरण आणि एलिव्हेटेडला मुहूर्त मिळेल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील कासारवाडी (नाशिक फाटा) येथून नाशिक महामार्ग सुरू होतो. तेथून राजगुरुनगरपर्यंत महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांसह महामार्गाचा समावेश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारित आहे.
नाशिक फाट्यापासून मोशीतील इंद्रायणी नदी पुलापर्यंत रुंदीकरण व सेवा रस्ता प्रस्तावित आहे. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी महापालिकेने रुंदीकरणास अडथळा ठरणारी व अतिक्रमण केलेली बांधकामे पाडली. भूसंपादन करून एनएचएआयकडे जागा सुपूर्द केली आहे. परंतु अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. परिणामी, नागरिकांना नाशिक फाटा ते राजगुरूनगरपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
कोंडीची ठिकाणे
- गुडविल चौक, भोसरी एमआयडीसी
- लांडेवाडी चौक, भोसरी
- शीतलबाग ते धावडेवस्ती सेवा रस्ते (चांदणी चौक, पीएमटी चौकासह)
- सद्गुरूनगर चौक, भोसरी
- राजे शिवछत्रपती चौक, मोशी (वखार महामंडळ किंवा जयगणेश साम्राज्य चौक)
- बनकरवाडी ते गावठाण ते भारतमाता चौक, मोशी
- चिंबळी आणि कुरुळी फाटा
- आळंदी फाटा
- तळेगाव चौक (तळेगाव-शिक्रापूर रस्ता चौफुली) चाकण
- आंबेठाण चौक चाकण
- बिरदवडी फाटा
कोंडीची कारणे
- औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतूक अवजड वाहनांची वर्दळ
- पिंपरी, चिंचवड, भोसरी भागांतील नोकरदारांची दुचाकी वाहने
- औद्योगिक भागात पीएमपी बस सुविधा नसल्याने खासगी वाहनांचा वापर
- रखडलेले रुंदीकरण, खचलेल्या साईडपट्ट्या
- महामार्गावरील अनधिकृत रिक्षा थांबे, रुंदीकरणाच्या पाडकामानंतर राडारोडा जागेवर
- विरुद्ध दिशेने सर्रासपणे येणारे वाहनचालक
- रस्त्याच्याकडेच्या टपऱ्या, हातगाड्या, पथारीवाल्यांचे अतिक्रमण
- दुभाजकाची उंची कमी असल्याने सहजपणे ओलांडून जाणारे पादचारी
- वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन
रुंदीकरण कशासाठी...?
- अंतर्गत भागाची ‘कनेक्टिव्हिटी’ सुधारणे
- महामार्गावरील रहदारी सुरळीत करणे
- सेवा रस्त्यांची निर्मिती करणे
- पावसाळी पाण्याचा निचरा करणे
- अधिक सुरक्षित वाहतूक होणे
- भोसरी, मोशी, चाकणच्या बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी पर्याय
- विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांचा प्रतिबंध करणे
- वाहनांच्या प्रकारानुसार मार्गिका (लेन) निर्मिती
- अवजड वा नादुरुस्त वाहने थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
- एसटी व पीएमपी प्रवाशांसाठी बस थांब्यांची व्यवस्था
दृष्टिक्षेप...
- नाशिक फाटा ते राजगुरूनगर लांबी ः २८ किलोमीटर
- सद्यस्थितीत विविध ठिकाणी रुंदी ः १२ ते २४ मीटर
- भविष्यातील एकूण रुंदी ः ८४ मीटर
- नियोजित प्रत्येक सेवा रस्ता रुंदी ः १२ मीटर
- नियोजित एलिव्हेटेड ः ८ मार्गिका (लेन)
- नियोजित मार्गाचा अंदाजित खर्च ः ७,८२७ कोटी रुपये
अशी आहे वस्तुस्थिती
- मोशी, चिखलीसह चाकणमधील औद्योगीकरणामुळे दरवर्षी वाहनसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ
- सध्या राजगुरुनगर ते नाशिक फाटा अंतर पार करण्यासाठी गर्दीच्यावेळेस सुमारे अडीच ते तीन तासांचा वेळ
- नाशिक फाटा ते राजगुरुनगर संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड केल्यास केवळ २० मिनिटांत अंतर पार करणे शक्य
असे आहे नियोजन
- नाशिक फाटा ते राजगुरुनगर संपूर्ण मार्गावर मोशी व चाकण येथे अंतर्गत वाहनांसाठी उड्डाणपूल, सद्गुरुनगर, राजे शिवछत्रपती चौकात ग्रेड सेपरेटर
- रस्त्याचे काम दोन टप्प्यांत नाशिक फाटा ते मोशी टोल नाका (इंद्रायणी नदी पूल) आणि मोशी ते चांडोली टोल नाका (राजगुरुनगर)
- नाशिक फाटा ते राजगुरुनगर आठ मार्गिकेच्या एलिव्हेटेड मार्गाला ऑगस्ट २०२४ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, त्यानंतर टेंडर प्रक्रिया