.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : महापालिकेने हाती घेतलेल्या आदर्श रस्त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील १७ रस्त्यांची कामे दीड महिना उलटल्यानंतर तसेच पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाही पूर्ण झालेली नाहीत. संबंधित रस्त्यांचे ८५ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार असल्याचे महापालिका सांगत आहे. प्रत्यक्षात पावसाळा सुरू होण्यास अवघे १५ ते २० दिवस राहिलेले असताना या कालावधीत तरी पथ विभागाकडून रस्त्यांची कामे पूर्ण होणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील अरुंद रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, ठिकठिकाणी आलेले उंचवटे, रस्त्यांवरील चेंबरच्या झाकणांभोवती पडलेले खड्डे, काँक्रिट रस्त्याच्या मध्यभागी पडणाऱ्या भेगा, अशास्त्रीय गतिरोधक, वाहतुकीच्या चिन्हांचा अभाव यांसारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे शहरातील रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे होण्याचे प्रमाणही अधिक असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथ विभागातर्फे पहिल्या टप्प्यात शहरातील १५ रस्त्यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार, संबंधित १५ आदर्श रस्त्यांची कामे महापालिकेकडून पूर्ण करण्यात आली. या रस्त्यांवरील कामांमुळे वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत झाल्याचा निष्कर्ष वाहतूक विभागाने काढला आहे.
अशी आहे स्थिती
- १५ रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आल्यानंतर मार्च महिन्यात महापालिकेच्या पथ विभागाने आणखी १७ रस्ते ‘आदर्श रस्ते’ करण्याचे काम सुरू केले
- त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील १७ रस्त्यांची निवड केली
- ही कामे दीड महिन्यात व पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निश्चित केले होते
- दीड महिना उलटून गेल्यानंतर तसेच पावसाळा १५-२० दिवसांवर आलेला असताना अजूनही संबंधित रस्त्यांची कामे सुरू आहेत
- कामाची गती पाहता ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार का? असा प्रश्न आहे
अशी आहेत दुरुस्तीची कामे
- रस्त्यांवरील विद्युत केबल, जलवाहिन्या, मलवाहिन्यांची कामे पूर्ण करणे
- रस्ता रुंदीकरण करून त्यावर चांगल्या दर्जाचे डांबरीकरण करणे
- रस्त्यामधील चेंबरच्या झाकणांभोवती दुरुस्ती करून ते समपातळीला आणणे
- इंडियन रोड काँग्रेसच्या नियमांनुसार गतिरोधक, रम्बलर्स, रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे, वाहतूक चिन्हांचे फलक, रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे
- पदपथ व्यवस्थित करणे
१७ पैकी १३ रस्त्यांचीच कामे
महापालिकेच्या पथ विभागाने मार्च महिन्यात १७ रस्त्यांवर कामे केली जाणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात सासवड रस्ता, कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण रस्ता, महात्मा गांधी रस्ता, प्रिन्स ऑफ वेल्स रस्ता हे चार रस्ते महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याची आठवण महापालिकेला आता झाली आहे. त्यामुळे ते चार रस्ते वगळता उर्वरित १३ रस्त्यांपैकी जुना एअरपोर्ट रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्ता, साधू वासवानी रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर आळंदी रस्ता, पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता, टिळक रस्ता, कोंढवा रस्ता, बंडगार्डन रस्ता यासह आणखी एका रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.
आदर्श रस्त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील १७ पैकी ४ रस्ते महापालिकेच्या हद्दीत नाहीत. त्यामुळे उरलेल्या १३ रस्त्यांपैकी ७ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. आत्तापर्यंत संबंधित रस्त्यांची ८५ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका