
पुणे (Pune) : आंबेगावमध्ये विकास आराखड्यात मंजूर असलेला १२ मीटर रुंदीचा सरळ रस्ता वळवून त्याला नागमोडी करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मनस्वी सोसायटी ते बाह्यवळण रस्ता विकास आराखड्यात बदल करत महापालिकेकडून दिशाभूल केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
आंबेगाव-दत्तनगर रस्त्याला व कात्रज देहूरोड बायपासला जोडण्यासाठी २०१२च्या मंजूर विकास आराखड्यात सदर रस्ता १२ मीटर रुंदीचा आणि ४०० मीटर लांबीचा दाखविण्यात आला आहे. मात्र, संबंधित रस्ता वळविला असून तो झाल्यास तीव्र उताराचा आणि नागमोडी होणार आहे. त्यामुळे अपघात होऊ शकतात आणि पीएमपी बसही वळणार नाही. नागरिकांना अंधारात ठेऊन, महापालिका प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी विकास आराखड्यातील रस्ता वळवत चक्क सोसायटीचा खासगी रस्ता विकास आराखड्यातील असल्याचे भासविले आहे. विकास आराखड्यातील मूळ रचनेप्रमाणे रस्ता विकसित करवा, अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असून तीव्र आंदोलनही उभारणार असल्याचे माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी सांगितले.
विकास आराखड्यातील १२ मीटर रस्ता स्वतंत्र असून त्याचा रामनगरी सोसायटीच्या मालकीच्या ९ मीटर रस्त्याशी काहीही संबंध नसून १२ मीटर विकास आराखड्यामध्ये दाखवणे ही फसवणूक आहे. प्रशासनाने हा रस्ता विकसित करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असे रामनगरी सोसायटीचे सचिव भारत आलदर यांनी सांगितले. याबाबत माजी नगरसेवक बेलदरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेत निवेदन दिले आहे. यावेळी माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांच्यासह रामनगरी सोसायटीतील संचालक आणि सभासद उपस्थित होते. संबंधित रस्त्यावर खासगी मालकाच्या असलेल्या २७ गुंठे जागेमुळे महापालिका प्रशासनाने सदर रस्ता वळवून लगतच्या रामनगरी सोसायटीअंतर्गत असल्याचे भासविले आहे. संबंधित रस्त्याच्या विकसनासाठी मान्यता घेत निधीची तरतूद केली असून त्या निधीमध्ये केवळ २०० मीटर लांबीचा रामनगरी सोसायटीमधील रस्ता ताब्यात घेत, नव्याने करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पुढे कात्रज बाह्यवळण मार्गाच्या बाजूने ९० मीटर रस्ता मात्र होणार नाही. कारण, संबंधित जागामालक जागा देण्यास तयार नाहीत. मग प्रशासन सोसायटीचा हा रस्ता विकास आराखड्यातील रस्ता असल्याचे का भासवत आहे?, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
बांधकाम विकास विभागाकडून आम्हाला ज्या पद्धतीने आखणी करून देण्यात येईल. त्यानुसार मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्ता विकसित करण्याचा पथ विभागाचा मानस आहे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग महापालिका.
अशा प्रकारे कुठलाही चुकीचा प्रकार घडलेला नसावा. परंतु, याबाबत मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. यावर सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल.
- श्रीधर येवलेकर, अधिक्षक अभियंता, बांधकाम विकास विभाग