पुणे (Pune) : महापालिकेच्या वाहन विभागाच्या ताफ्यातील ॲम्बेसिडर कारचा वापर करणे दिवसेंदिवस महाग होऊ लागले आहे. त्यामुळे या कार स्क्रॅपमध्ये काढून, त्याऐवजी महापालिका पर्यावरणपूरक व अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त इलेक्ट्रिक कार घेणार आहे.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांना महापालिका प्रशासनाच्या वतीने वाहन व्यवस्था पुरविली जाते. महापालिकेच्या पाणी पुरवठा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन अशा विविध विभागांमधील अधिकाऱ्यांसाठी जुन्या ॲम्बेसिडर कारचा वापर केला जातो. आवश्यकतेनुसार, नवीन वाहने घेणे व १५ वर्षे जुनी झालेली वाहने भंगारात काढण्याची प्रक्रिया नियमितपणे केली जाते. दरम्यान, महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकाऱ्यांकडे ॲम्बेसिडर कार आहेत. संबंधित कार जुन्या झाल्या असून त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढत चालला आहे. त्यांचे उत्पादन बंद झाल्याने सुटे भाग मिळत नसल्याने वाहन विभागाची अडचण होऊ लागली आहे.
या पार्श्वभूमीवर तसेच राज्य सरकारकडूनही ध्वनी आणि हवा प्रदूषण कमी करण्यासाठी शासकीय संस्थांनी ई-कार घेण्याबाबत आदेश दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन ३९ जुन्या ॲम्बेसिडर कार स्क्रॅपमध्ये काढणार आहे. त्यांच्याजागी अद्ययावत इलेक्ट्रिक कार घेतल्या जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. सध्या ६५ ई-कार महापालिकेच्या वाहनांच्या ताफ्यात असून, त्यामध्ये ३९ ॲम्बेसिडर कारच्याजागी तितक्याच ई-कारची भर पडणार आहे.
महापालिकेकडील वाहने
१ हजार ३७८ - एकूण वाहने
६५ - इलेक्ट्रिक कार
३९ - ॲम्बेसिडर कार