
पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्ते चांगले करून वाहतूक गतिमान करण्यासाठी पुणे महापालिकेने (PMC) ‘मिशन १५’ (Mission 15) अंतर्गत प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण, सुशोभीकरण, वाहतुकीला अडथळा ठरणारे घटक दूर करण्याचे काम सुरू केले आहे.
त्याचसोबत पादचारी मार्गांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या महापालिकेने केवळ डांबरीकरणाचा सपाटा लावला आहे. ‘व्हीआयपी’ रस्त्यावरील पादचारी मार्ग खचले असून, ‘पेव्हिंग ब्लॉक्स’ निघाले आहेत. अनेकांना चालताना ठेच लागते. पण त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष दिसत आहे.
शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. ‘टॉमटॉम’च्या अहवालानुसार १० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तब्बल ३३ मिनिटे लागत असून, वाहतूककोंडी होण्यात पुणे जगात चौथ्या क्रमांकाचे शहर झाले आहे.
रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेज, चेंबर, पावसाळी गटारे, गतिरोधक, तुटलेले दुभाजक, सदोष सिग्नल यंत्रणा यामुळे वाहतूककोंडी होत आहे. शिवाय रस्ते, पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, चुकीच्या पद्धतीने होणारे पार्किंग यामुळे ही समस्या आणखी तीव्र झाली आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक गतिमान व्हावी, यासाठी यापुढे पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये ‘मिशन १५’ मधील ‘व्हीआयपी’ रस्त्यांवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
चालणेही अवघड
महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्याचा भागा ‘हेरिटेज वॉक’चा भाग या ‘मिशन १५’ मध्ये घेतला. शिवाजी रस्ता, नेहरू रस्ता, टिळक रस्ता, म्हात्रे पूल, शिवाजीनगरमधील अंतर्गत रस्ते, महर्षीनगर आदी भागांतील पादचारी मार्ग काही ठिकाणी खचले आहेत.
काही ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी ‘पेव्हिंग ब्लॉक’ ढिले झाल्याने नागरिकांना चालताना त्रास होत आहे. तरीही ‘मिशन १५’ मध्ये पादचारी मार्गाच्या दुरुस्तीचा समावेश झाला नाही. केवळ डांबरीकरणावरच भर देण्यात आला आहे.
कुठे कुठे अर्धवट डांबरीकरण
रस्ते डांबरीकरण करण्यापूर्वी मशिनने रस्ता खरडून काढून जुने डांबर काढले जात आहे. त्यानंतर त्यावर नव्या डांबराचा थर टाकला जात आहे. पण महापालिकेने सलग रस्त्याचे डांबरीकरण न करता तुकड्या तुकड्यांमध्ये काम सुरू केले आहे.
त्यामुळे काही रस्ता जुना, तर काही रस्ता नवा असा प्रकार दिसून येत आहे. बाजीराव रस्त्यावर गेल्या चार दिवसांपासून खरडून ठेवलेल्या रस्त्याचे डांबरीकरण अद्याप पूर्ण केले नाही.
खर्चाचा तपशील मिळेना
महापालिकेने रस्ते चांगले करण्यासाठी डांबरीकरण सुरू केले आहे. काही ठिकाणी तर सिमेंटच्या रस्त्यावर, ‘पेव्हिंग ब्लॉक’वरही डांबराचा थर टाकून दिला आहे. तसेच, महापालिकेने मोठ्या प्रमाणात डांबरीकरण सुरू केले असताना त्यासाठी किती खर्च आला, किती टेंडरमधून काम सुरू आहे, याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. काम पूर्ण झाल्यावर हा तपशील संकलित केला जाईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
‘मिशन १५’ मधील रस्ते
नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्ता-बाजीराव रस्ता हेरिटेज वॉक.
‘मिशन १५’ मध्ये डांबरीकरण, चेंबर उचलणे, दुभाजक दुरुस्ती या कामाला प्राधान्य दिले जात आहे. पादचारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम आताच केले जाणार नाही. ‘मिशन १५’च्या कामासाठी झालेला खर्च काम संपल्यानंतर कळू शकेल. आता ही माहिती उपलब्ध नाही.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथविभाग, महापालिका