
पुणे (Pune) : शहरात वृक्षांची संख्या मोठी असली, तरी त्यातील अनेक धोकादायक आहेत. फांद्या वाढल्या आहेत, वाळलेल्या फांद्या अचानक रस्त्यावर पडून त्यात नागरिक जखमी होत आहेत. काही जणांचा जीवही गेला आहे. तरीही महापालिकेच्या उद्यान विभागाला आणि क्षेत्रीय कार्यालयांना जाग आलेली नाही. फांद्यांची छाटणी करावी, वाळलेली झाडे काढून घ्यावीत, असे अर्ज क्षेत्रीय कार्यालयांकडे दिले आहेत. पण कर्मचारी, अधिकारी टेंडर संपले आहे, तुम्ही खासगी ठेकेदाराला पैसे देऊन काम करून घ्या, असे सांगत आहेत. त्यामुळे धोकादायक फांद्या, वाकलेल्या झाडांमुळे भयानक स्थिती निर्माण झाली आहे.
सोमवारी (ता. २६) सायंकाळी अलंकार पोलिस ठाण्याच्या जवळ झाडाची फांदी कोसळून राहुल श्रीकांत जोशी (वय ४९) यांचा मृत्यू झाला. यापूर्वी शनिवार पेठेत ओंकारेश्वर मंदिराजवळ चहा पीत थांबलेल्या अभिजित गुंड या तरुणाच्या डोक्यात वाळलेली फांदी पडून त्याचाही मृत्यू झाला होता, तर टिळक रस्त्यावर झाड पडून त्या वेळी माळसिंग पवार यांचा मृत्यू झाला होता. अशा दुर्घटना घडल्या, की महापालिका प्रशासन काही दिवस गांभीर्याने काम करते. त्यानंतर पुन्हा या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने ही समस्या गंभीर होत चालली आहे. जानेवारी ते २६ मेपर्यंत शहरात ३५९ झाडे उन्मळून पडली आहेत, तर २०२५ मध्ये तब्बल एक हजार ६८५ झाडे पडली होती.
अर्जांची स्थिती
- धोकादायक वृक्ष तोडणे किंवा त्याच्या फांद्या तोडण्यासाठी नागरिकांकडून, सोसायट्यांकडून क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज केला जातो
- तेथील वृक्ष अधिकारी तथा सहाय्यक आयुक्तांना त्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार असतात
- हॉर्टिकल्चर मिस्त्रींवरही आलेल्या तक्रारींची शहानिशा करून त्यावर योग्य कारवाई करून त्याचा अहवाल सादर करणे आवश्यक असते
- झाडाच्या फांद्या तोडणे, छाटणी याच्या ऑनलाइन तक्रारी आल्यानंतर त्या परस्पर बंद करून टाकल्या जातात
- क्षेत्रीय कार्यालयाकडे आलेल्या अर्जांवर अनेक महिने निर्णय घेतले जात नाहीत
- नागरिक अनेकदा खेटे मारतात, पण त्यांना दाद दिली जात नाही
- नागरिकांनी विनापरवानगी फांद्या छाटल्यास त्यांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पिळवणूक करण्याचे प्रकार घडतात
- काही जणांचे अर्ज एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित
खासगी ठेकेदारांसोबत सेटिंग
नागरिकांनी तक्रार केल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाने त्याची तपासणी करून फांद्यांची मोफत छाटणी, वाळलेल्या फांद्या तोडणे, धोकादायक झाड कायदेशीर प्रक्रिया करून तोडणे अपेक्षित आहे. पण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून हे काम करण्यासाठी निधी संपला आहे, निविदेची मुदत संपली आहे, नवीन निविदा अजून काढलेली नाही, निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दिला आहे, पण त्याला वेळ लागेल अशी कारणे देऊन, तुम्ही खासगी ठेकेदाराला पैसे देऊन तुमचे काम करून घ्या, असा अजब सल्ला दिला जातो. खासगी ठेकेदार काम करण्यासाठी १० हजारांपेक्षा जास्त रक्कम घेतो. त्यामुळे जे काम फुकट होऊ शकते, त्यासाठी नागरिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. खासगी ठेकेदारांसोबत कर्मचाऱ्यांचे लांगेबाध असल्यामुळेच हे प्रकार घडत आहेत.
उद्यान विभागाचे क्षेत्रीय कार्यालयाकडे बोट
उद्यान विभाग आणि वृक्ष संवर्धन समिती हे दोन वेगळे विभाग आहेत. पण या समितीचे सचिव हे उद्यान अधीक्षक आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात वृक्षतोडीसाठी दिलेल्या परवानग्या, नव्याने लावलेली झाडे, पुनर्रोपण केलेली झाडे, सोसायट्यांकडून आलेले अर्ज याची माहिती मागितली असता ती क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे असे सांगितले जाते. ही संपूर्ण शहरातील माहिती संकलित केली जात नसल्याने त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही, अतिरिक्त आयुक्त, आयुक्तांनाही ही माहिती कधीही उपलब्ध होत नाही. तसेच हे दोन्ही विभाग अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडित नसल्याने त्यांना कमी महत्त्वाचे समजून लक्ष दिले जात नाही.
फांदी पडून झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला जाईल. आवश्यक त्या ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटणे, वाळलेली झाडे तोडण्याची कार्यवाही होईल. या कामासाठी निधी, आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यात आले असून बैठकीत त्याबाबत खात्री करण्यात आली आहे. त्यामुळे ही काम करण्यात कोणताही अडथळा नाही.
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
झाडपडीच्या घटना वर्ष
महिना - २०२४ - २०२५
जानेवारी - १४ - २५
फेब्रुवारी - २५ - २७
मार्च - ४२ - ३९
एप्रिल - १२४ -७२
मे - ४९१ - १९६ (२६ मेपर्यंत)
जून - ३३९
जुलै - ३०४
ऑगस्ट - १५२
सप्टेंबर - ९९
ऑक्टोबर - ६०
नोव्हेंबर - १७
डिसेंबर - १८