
पुणे (Pune) : मॉन्सूनचे आगमन होऊन शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नाल्यात, रस्त्यावर भरपूर पाणी वाहत आहे. असे असताना सिंहगड रस्ता (Sinhagad Road) क्षेत्रीय कार्यालय, नगर रस्ता वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाले सफाई व पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची टेंडर (Tender) काढली आहे. त्यामुळे आता या टेंडर काढून काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले आणि पावसाळी गटारे सफाई करण्याच्या अनेक टेंडर एप्रिल महिन्यात काढल्या. यामध्ये २३ टेंडर या नाले सफाईच्या असून, त्यासाठी १४ कोटी तर पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी १५ टेंडर काढण्यात आल्या. त्यासाठी १२.५० कोटी रुपये खर्च केला जात आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
नाले सफाई करताना नाल्यातील कचरा नाल्यातच पसरवून टाकणे, गाळ नाल्याच्या शेजारी टाकणे, तो वाहून न नेणे असे प्रकार शहरात घडले आहेत. नाले सफाई व पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची कामे सात जूनपर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. पण मॉन्सूनचे आगमन लवकर झाल्याने या कामाचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच आता स्थायी समितीपुढे सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा मंजुरीसाठी आल्या.
सिंहगड रस्ता परिसरात पावसाळी गटारांच्या स्वच्छतेअभावी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. पण आता याच क्षेत्रीय कार्यालयाची पावसाळी गटाराची स्वच्छता करणारी टेंडर स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवली आहे. महापालिकेच्या पूर्वगणनपत्रकाच्या १५ टक्के कमी दराने टेंडर आल्या असून, ६८ लाख दोन हजार ६१० रुपये इतक्या रकमेची टेंडर सार्थक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने भरली आहे.
नगर रस्ता वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील वाघोली परिसरातील नालेसफाई करण्यासाठी तब्बल ५० टक्के कमी दराने टेंडर आली आहे. मे. एम. एस. जे. बी. चव्हाण या ठेकेदाराने हे काम २६ लाख ८७ हजार २२३ रुपयांमध्ये करण्याची तयारी दाखवली आहे.
टेंडर दीड महिना उशिराने
मे महिना संपत आला असून, पावसाळाही सुरू झाला आहे. मागील आठवडाभरात शहरातील अनेक नाले, ओढ्यांना पुर आलेला आहे. कचरा वाहून गेला आहे, असे असताना नाले सफाई व पावसाळी गटार स्वच्छतेची टेंडर जवळपास दीड महिने उशिराने आली आहे. त्यामुळे या टेंडरचा उपयोग काय होणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
त्याचप्रमाणे कोथरूड - बावधन, येरवडा - कळस - धानोरी, ढोले पाटील, सिंहगड रस्ता या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये मलनिस्सारण वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी टेंडर काढल्या आहेत. या टेंडरही पूर्वगणनपत्रकापेक्षा ३० टक्क्यांपेक्षा कमी दाराने आलेल्या आहेत.