
पुणे (Pune) : महापालिकेकडून एकीकडे ३२ रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात असताना विश्रांतवाडी ते विमानतळदरम्यानचा ‘व्हीआयपी’ मार्ग मात्र सुधारण्याची चिन्हे नाहीत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी या रस्त्याचा सर्वाधिक वापर केला जात असूनही काही महिन्यांपासून ठेकेदाराकडून रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांनाच नव्हे, तर स्थानिक रहिवाशांनाही याचा फटका बसत आहे.
महापालिकेच्या पथ विभागाकडून शहरातील १५ रस्ते ‘आदर्श रस्ते’ करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली. या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित १७ रस्त्यांमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे. याबरोबरच शहरातील अन्य रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचीही कामेही सध्या सुरू आहेत. मात्र विश्रांतवाडी ते विमानतळ या दरम्यानच्या टिंगरेनगर येथील रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. टिंगरेनगरमधील गल्ली क्रमांक सहा-सातपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु गल्ली क्रमांक ९ ते १३ पर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे.
टिंगरेनगर व धानोरीकडील वाहने येरवडा, खराडीकडे जाण्यासाठी ५०९ चौकातून संबंधित रस्त्याने पुढे जातात. विमानतळावरून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची याच रस्त्याने ये-जा असते. शाळा, दवाखाने, गॅस एजन्सी, बॅंका अशा ठिकाणी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला व नोकरदारांचे वाहतूक कोंडीमुळे हाल होत आहेत. रस्त्याच्याकडेला राडारोडा, खडी पडलेली आहे.
ठेकेदारावर कारवाई कधी?
ठेकेदाराकडून संबंधित रस्त्याचे काम गांभीर्याने केले जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. याबरोबरच याच ठेकेदाराकडे अन्य दोन रस्त्यांचीदेखील कामे आहेत, त्यापैकी एका रस्त्याचे काम रेंगाळलेले आहे. त्यामुळे संथगतीने काम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध महापालिका केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्याबाबत तक्रारी येत आहेत. संबंधित ठेकेदाराला लवकरच नोटीस बजावण्यात येईल. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाईल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, महापालिका