
पुणे (Pune) : शहरात रोज आगीच्या अनेक घटना घडत असताना अग्निशामक दलावर कामाचा ताण आहे. शहराची हद्द मोठी झाल्याने कमी वेळात घटनास्थळी पोचण्याचे आव्हान आहे. असे असताना अग्निशामक दलातील २७ वाहनांचे आयुर्मान संपल्याने त्यांना सेवेतून बाहेर काढले आहे.
सध्या अग्निशामक दलाच्या ताफ्यात २२ बंब आणि ५ टँकर आहेत. त्यामुळे नवीन वाहने खरेदी करण्यासाठी २४ कोटी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर केला आहे. यामध्ये उंच इमारतींना आग लागल्यास १५ ते १६ मजल्यापर्यंत पाणी मारण्याची क्षमता असणारे पाच बंब घेतले जाणार आहेत. गेल्या काही वर्षात पुण्याची हद्द वाढली आहे. ३४ गावांच्या समावेशानंतर पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ ५१८ चौरस किलोमीटर झाले होते. उरुळी व फुरसुंगी ही दोन गावे वगळल्यानंतर आता ४८० चौरस किलोमीटर शहराचे क्षेत्रफळ आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये अग्निशामक दलाचे केंद्र सुरु करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. पण अग्निशामक केंद्रासाठी जागा, मनुष्यबळ आणि वाहनांची पुरेशी संख्या आवश्यक असते.
पुणे शहराची लोकसंख्या ६० लाखाच्या घरात आहे. नियमानुसार प्रत्येक १ लाख लोकसंख्येच्या मागे अग्निशामकचा एक बंब असला पाहिजे असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात स्थिती यापेक्षा भिन्न असून, आजमितीस शहरात २० अग्निशामक केंद्र आहेत. उपनगरांमधील अनधिकृत गोदामे, भंगार सामान, कचरा, रस्त्यावर उभी केलेली वाहने, हॉटेल, घराला आग लागते, तसेच टेकड्यांवर वणवा पेटतो. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढते. अशा प्रकारे महिन्याला सरासरी २०० ते २२५ तर वर्षाला २४०० ते २५०० आगी शहरात लागतात. कधी कधी आग खूप मोठी असल्यास एकाच ठिकाणी चार ते पाच बंब पाठवावे लागतात. अशा वेळी मदतीसाठीचे योग्य नियोजन करताना अग्निशामक दलाची कसरत होते. शहराची गरज ओळखता गेल्या काही वर्षात अग्निशामक दलाचे अत्याधुनिकरण सुरु आहे, मनुष्यबळही वाढविण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या ताफ्यात १० टँकर आणि विविध प्रकारचे ४४ बंब आहेत. पण त्यातील ५ टँकर आणि २२ बंब यांचे आयुर्मान १५ वर्ष झालेले आहे, त्यामुळे त्यांना सेवेतून बाहेर काढण्यात आले आहे.
नवीन बंब खरेदी
एकाच वेळी २२ बंब आणि ५ टँकर अग्निशामक दलाच्या ताफ्यातून बाहेर पडल्याने वाहनांची संख्या निम्मी झाली आहे. त्यामुळे आता नवीन बंद खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये ६ अत्याधुनिक बहुउद्देशीय अग्निशामक बंबांचा समावेश असून, त्यासाठी ११ कोटी ९९ लाख ४७ हजार रुपयांची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवली आहे. तसेच गल्ली, झोपडपट्टीमध्ये मध्ये वापरण्यासाठी आकाराने छोटी असलेली गाडी घेतली जात असून, त्यासाठी १ कोटी १२ लाख ६५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे.
अग्निशामक दलाची क्षमता वाढणार
पुणे शहरात उंच इमारती बांधण्याचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेच्या हाय राइज समितीने १५० मिटर उंचीपर्यतच्या इमारतींना परवानगी दिली आहे. २० मजल्यापर्यंतच्या अनेक इमारती शहरात उभ्या आहेत. पण त्यातुलनेत अग्निशामक दलाकडे उंचावर पाणी मारणारे बंब उपलब्ध नाहीत.
त्यामुळे आता उंचावर पाणी मारण्यासाठी ५ अत्याधुनिक बंब महापालिका घेणार असून, त्यांचा यापूर्वी अग्निशामक दलाच्या ताफ्यात समावेश नव्हता. सध्याची अग्निशामक दलाची क्षमता ही ७ ते ८ मजल्यापर्यंत पाणी मारण्याची होती, पण हे बंब घेतल्यानंतर १५ ते १६ मजल्यापर्यंत पाणी मारता येणार आहे. या बंबांना पाइप जोडता येणार असून, ते वजनाने हलके आहेत, त्यामुळे जवानांनी हाताळणे सोपे होणार आहे. यासाठी महापलिका १० कोटी ८६ लाख ७७ हजार रुपये खर्च करत आहे.
‘आरटीओच्या नियमाप्रमाणे १५ वर्षापेक्षा जास्त आयुर्मान असलेल्या गाड्या वापरता येत नाहीत. त्यामुळे अग्निशामक दलातील २७ गाड्या ताफ्यातून बाहेर काढल्या आहेत. नवीन अत्याधुनिक वाहने घेण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे.’
- देवेंद्र पोटफोडे, प्रमुख, अग्निशामक दल