
पुणे (Pune) : महामेट्रोने कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम करताना नळस्टॉप चौकात उड्डाणपूल बांधला आहे. या कामासाठी पूर्वगणनपत्रकात निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त खर्च झाला असल्याचा दावा महामेट्रोने करून महापालिकेकडे वाढीव खर्चाच्या १४ कोटी रुपयांची मागणी केली होती. अखेर महापालिकेने ही रक्कम देण्यास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
वनाज कॉर्नर ते रामवाडी मेट्रोचे काम करताना कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नळ स्टॉप चौकात उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उड्डाणपूल महामेट्रोकडून बांधून घेण्यास २०२० मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली. त्यावेळी ३९ कोटींच्या खर्चास मान्यता दिली होती. पण हे काम पूर्ण झाल्यानंतर महामेट्रोने या उड्डाणपुलासाठी एकूण ५८ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे वाढीव खर्चासाठी १९ कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली होती.
महापालिकेने या कामाची तसेच खर्चाची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी सीओईपीला सल्लागार म्हणून नियुक्त केले. त्यामध्ये सीओईपीने १९ कोटी नव्हे तर १४ कोटींचा खर्च जास्त झाला असल्याचा अहवाल दिला. त्यानुसार हा निधी महामेट्रोस देण्यास महापालिकेने स्थायी समितीमध्ये प्रस्ताव ठेवला होता.त्यास आज महापालिका प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली. महापालिकेच्या अर्थसंकल्पात मेट्रोच्या कामासाठी १५ कोटी ८० लाखाची तरतूद आहे, त्यातून हा निधी देण्यात आला आहे.